Talegaon Dabhade News : विकासकामांसाठी निधी कमी पडून देणार नाही; पण कामे दर्जेदार करून घ्या – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – इंदोरी गावातील नळ पाणी पुरवठा योजना, ग्रामपंचायत प्रशासकीय इमारत, अंतर्गत रस्ते, व्यायामशाळा, अंगणवाडी, समाजमंदिर, स्मशानभूमी, मैला उपसा यंत्र, स्ट्रीट लाईट पोल बसविणे आदी विकास कामांसाठी सुमारे 8 कोटी 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पुढील काळात देखील इंदोरी गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडून देणार नाही; पण विकास कामे चांगली व दर्जेदार करून घ्या. जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनेमुळे इंदोरी गावातील भविष्यातील 40 वर्षांची पाण्याची समस्या सुटणार आहे असे वक्तव्य आमदार सुनील शेळके यांनी इंदोरी येथील विकास कामांच्या भूमिपूजनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

यावेळी माजी आमदार दिगंबर भेगडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम कारखाना उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, भंडारा डोंगर दशमी समिती अध्यक्ष साहेबराव काशीद, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव,अण्णासाहेब भेगडे, नारायण ठाकर, ज्येष्ठ नेते बबनराव ढोरे, निवृत्ती ढोरे, दामोदर शिंदे, पंचायत समिती सभापती ज्योतीताई शिंदे, मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा सुवर्णा राऊत, कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके, नगरसेवक सुनिल ढोरे, सरपंच, उपसरपंच, सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान आमदार शेळके म्हणाले की, मावळ तालुक्याचा विकास करत असताना, पुढील 50 वर्षांचा विचार करून येथील जनतेला आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा, रोजगार यांचा विचार करून आम्ही काम करतोय तसेच पुढील काळात इंदोरी येथे आरोग्य केंद्र व दादु इंदोरीकर यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

आमदार सुनील शेळके यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून इंदोरी गावातील विविध विकास कामांसाठी 8 कोटी 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून यामध्ये प्रामुख्याने जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा करणे, इंदुरी ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत बांधणे, अंतर्गत रस्ते, व्यायामशाळा, अंगणवाडी बांधणे, ठक्कर बाप्पा योजनेतंर्गत रस्ते व समाज मंदिर बांधणे, मैला उपसा यंत्र उपलब्ध करणे, कुंडमळा येथे स्ट्रीट लाईट पोल बसविणे व स्मशानभूमी बांधणे इत्यादी विकास कामे होणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठलराव शिंदे, आभार अंकुश ढोरे, सूत्रसंचालन रमेश घोजगे, दिनेश चव्हाण यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.