Narendra Pendse : हिंदू समाज संभ्रमावस्थेत

एमपीसी न्यूज – सध्या हिंदू समाज संभ्रमावस्थेत असून तो आपले सत्त्व विसरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगापासून त्याने प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते नरेंद्र पेंडसे (Narendra Pendse) यांनी व्यक्त केले.

निगडी, प्राधिकरण येथील श्री केदारेश्वर मंदिर प्रांगण, पेठ क्रमांक 24 येथे कार्यक्रम झाला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (12 जून 2022) या तिथीनुसार छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या राज्याभिषेकाला तीनशे अठ्ठेचाळीस वर्षे पूर्ण झालीत. या प्रसंगाचे औचित्य साधून ‘हिंदू साम्राज्य दिन’ या विशेष कार्यक्रमात पेंडसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. माजी नगरसेविका शर्मिला बाबर अध्यक्षस्थानी होत्या. सामाजिक कार्यकर्ते विजय शिनकर, भास्कर रिकामे, बाळा शिंदे आणि श्रीकेदारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

व्याख्यानापूर्वी, विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक पोवाड्यांचे दमदार सादरीकरण केले. शिवपुतळ्याचे पूजन करून आणि “छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार!” या गीताचे सामुदायिक गायन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. शिवराज्याभिषेकाचे अतिशय रोमहर्षक वर्णन करून नरेंद्र पेंडसे पुढे म्हणाले की, “पुणे आणि सुपे ही छोटीशी जहागिरी असलेल्या शहाजीराजे यांच्या सुपुत्राने म्हणजे शिवबांनी आपल्या मातेच्या प्रेरणेतून हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. स्वराज्याचा विस्तार करताना त्यांनी मुरारबाजीसारख्या अनेक हिंदू सरदार, राजे यांची मनोभूमिका बदलून त्यांना स्वराज्याशी जोडून घेतले.

कल्याण, भिवंडी  येथील प्रांतातील पाडलेली मंदिरे पुन्हा उभारली; तर इस्लामी सत्तेच्या ताब्यातील मंदिरे मुक्त केलीत. जिंजी येथील मंदिर पाडून उभारलेल्या मशिदींचे मंदिरांमध्ये पुनर्निर्माण केले. कल्याणच्या मुस्लीम सुभेदाराच्या सुनेला साडीचोळीचा आहेर करून तिची सन्मानाने रवानगी करताना आपल्या निष्कलंक चारित्र्याचे प्रमाण इतिहासात अधोरेखित केले. आपली राजमुद्रा आणि अष्टप्रधान मंडळातील पदे संस्कृत भाषेतून उद्धृत केलीत. बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालकर यांचे इस्लाम धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात पुनर्वसन केले.

Santosh Jadhav Arrested : संतोष जाधव याने टक्कल करून पेहराव बदलला, मात्र तरीही पोलिसांनी ठोकल्या बेड्या

हिंदुस्थानाच्या दुर्दैवाने छत्रपती शिवाजीमहाराज यांना दीर्घायुष्य लाभले नाही; पण त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे झेंडे मराठी सरदारांनी अटकेपार रोवले. पूर्वीच्या अखंड भारतातील अनेक प्रांत आणि धार्मिक स्थळे हिंदूंनी गमावलेली आहेत. हिंदू साम्राज्य दिन साजरा करताना ती मुक्त करण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असेही ते (Narendra Pendse) म्हणाले.

सिंधुनगर मित्रमंडळ, विवेक मित्रमंडळ, नवनगर मित्रमंडळ, वरदविनायक मित्रमंडळ आणि ओम शिवतेज मित्रमंडळ यांनी संयोजनात सहकार्य केले. चंद्रकांत लिंगायत यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र बाबर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.