Pimpri News : ज्यांच्या घरासमोर कचरा, राडारोडा आढळेल त्यासाठी त्यांनाच जबाबदार धरा – आयुक्तांच्या सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला प्लास्टिक मुक्त शहर बनविण्याच्या संकल्पपूर्तीसाठी आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून व्यापक मोहिम राबविण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने या मोहिमेत सहभाग नोंदवून आपले योगदान द्यावे. बंदी असलेल्या प्लास्टिकचा सर्रास वापर करणा-यांवर कडक कारवाई करावी. काही नागरिक अद्याप देखील रस्त्यावर कचरा आणि राडारोडा फेकतात, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करताना अधिकचा दंड आकारावा. ज्यांच्या घरासमोर असा कचरा अथवा राडारोडा आढळेल त्यांनाच यासाठी जबाबदार धरावे, अशा सूचना आयुक्त राजेश पाटील यांनी दिल्या.

कचरा मुक्त शहर करण्याच्या अभियाना अंतर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज (मंगळवारी) आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

महापलिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल रॉय, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, मकरंद निकम, संजय खाबडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, उप आयुक्त मनोज लोणकर, स्वच्छ सर्वेक्षण चे समन्वयक सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, अभिजित हराळे, अण्णा बोदडे, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विजयकुमार थोरात, तसेच सर्व सहाय्यक आरोग्याधिकारी, आरोग्य निरीक्षक आदी उपस्थित होते.

आयुक्त पाटील म्हणाले, कचरा मुक्त शहर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सातत्याने क्षेत्र पाहणी केली पाहिजे. शासनाने यासाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. दिलेल्या सुचनांचे आणि आदेशांचे पालन न करणाऱ्या अधिकारी कर्मचा-यावर कडक कारवाई केली जाईल.

स्वच्छ सर्वेक्षण 2022 सुरु झाले असून पिंपरी-चिंचवड महापालिकेने या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. शहराला देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छाग्रह उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच स्वच्छ मोहिमेत लोकसहभाग वाढविण्यासाठी प्लॉगेथॉन मोहीम राबविण्यात येत आहे. काही नागरिक अद्याप देखील रस्त्यावर कचरा आणि राडा रोडा फेकतात , अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करताना अधिकचा दंड आकारावा असे निर्देश आयुक्त पाटील यांनी प्रशासनाला दिले. ज्यांच्या घरासमोर असा कचरा अथवा राडारोडा आढळेल त्यांनाच यासाठी जबाबदार धरावे. केवळ स्वच्छ सर्वेक्षणापुरती स्वच्छता मोहीम नसून स्वच्छतेची चळवळ निरंतर सुरु राहिली पाहिजे. ही चळवळ व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी नागरी सहभाग महत्वाचा असल्याचे आयुक्त पाटील म्हणाले.

अंतर्गत समन्वय, नागरी सहभाग, निरंतर स्वच्छता मोहीम या सुत्रीतून आपण शहर स्वच्छतेचे मोहिम सहज यशस्वी करू शकतो. येत्या 5 जून रोजी आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवस आहे. यानिमित्त या शहराला प्लास्टिक मुक्त शहर करण्याचा आपण संकल्प करूया. बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर प्रत्येकाने टाळला पाहिजे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत असून पावसाळ्यात पाण्यासोबत प्लास्टिक वाहते. त्यामुळे पाणी तुंबण्याची शक्यता वाढते. शिवाय जलप्रदूषण देखील मोठ्याप्रमाणात होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी आपण शहरातील रस्त्यावर अथवा मोकळ्या जागी नजरेस पडणारे प्लास्टिक संकलन करण्याचा दृढ संकल्प करूया. या माध्यमातून सकारात्मक संदेश जाणार असून शहराचा लुक चांगला होण्यासाठी मदत होणार आहे, असे आयुक्त पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.