Pune Crime News : जेवणाचे ताट अंगावर फेकल्याने पत्नीकडून पतीचा खून

एमपीसी न्यूज : जेवणाचे ताट अंगावर फेकल्याने रागावलेल्या पत्नीने डोक्यात बॅट मारून पतीचा खून केला आणि मृतदेह बाथरूममध्ये लटकावून आत्महत्या केल्याचा बनाव रचला. परंतु अंतिम संस्कार करताना मुलीने आईनेच बाबांचा खून केल्याचे नातेवाईकना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत यातील आरोपीला ताब्यात घेतले आहे. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी रात्री हा प्रकार घडला. 

दीपक बलवीर सोनार (वय 36) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे तर पोलिसांनी या प्रकरणी राधिका दीपक सोनार (वय 34) या महिलेला ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनार दाम्पत्य 14 वर्षीय मुलगी आणि 13 वर्षीय मुलासह गुरुवार पेठेत राहत होते. पती-पत्नी दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी कामे करतात. दीपक याला दारू पिण्याचे व्यसन होते. सोमवारी रात्री देखील दीपक दारू पिऊन घरी आला होता. यावेळी जेवण करत असताना त्याने जेवणाचे ताट पत्नीच्या अंगावर फेकले. त्यानंतर रागाच्या भरात राधिका हिने त्याला ढकलून देत डोक्यावर बॅटने मारहाण केली. तो बेशुद्ध पडल्यानंतर गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी ओढत बाथरूम मध्ये नेऊन गळ्याला दोरी अडकून आत्महत्या केली असे भासवले.

घरात असणाऱ्या दोन्ही मुलांना तिने चाकूचा धाक दाखवून याविषयी कोणालाही सांगू नका असे सांगितले होते. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. परंतु अंत्यसंस्कार सुरू असताना मुलीच्या अश्रुचा अचानक बांध फुटला आणि तिने आईने बाबांना मारल्याचे सांगितले. पोलिसांनी राधिका हिला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.