Chinchwad News: छत्रपती शिवाजी महाराजांबाबतचा वादग्रस्त व्हिडीओ प्रसारित केल्या प्रकरणी श्री. श्री. रविशंकर यांच्याकडे पोलिसांनी मागितला खुलासा

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांबाबतचा वादग्रस्त व्हिडीओ प्रसारित केल्या प्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री. श्री.रविशंकर यांच्याकडे पिंपरी चिंचवड पोलिसांनी खुलासा मागितला आहे. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी याबाबतची नोटीस बजावली आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंग चे श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत एक व्हिडिओ यु ट्यूबवर प्रसारीत केला. तसेच, एका दैनिकाच्या दिनदर्शिकेत वादग्रस्त लिखान केले. हा प्रकार संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या विरोधात प्रशासनाकडे तक्रार नोंदवली.

या व्हिडिओ व लिखानामुळे इतिहासाचे विकृतीकरण करुन खोडसाळ पध्दतीने महाराजांची बदनामी झाली. रवीशंकर यांनी महाराजांच्या पराक्रमावर जाणीवपूर्वक प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे सतीश काळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

काळे यांनी गेल्या दीड वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. रविशंकर यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी अनेक आंदोलने देखील केली.

रविशंकर यांनी त्यांच्या व्हिडीओ व लिखानाचे खंडन करावे किंवा तीस दिवसांत याबाबतचा खुलासा करावा, असे उपायुक्त भोईटे यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.