Wakad Crime News : टिंडर डेटिंग अॅपवरून आयटी अभियंता महिलेची 73 लाख 59 हजारांची फसवणूक; 18 बँक खात्यांवर घेतले पैसे

एमपीसी न्यूज – आयटी अभियंता असलेल्या महिलेला टिंडर डेटिंग अॅपवरील ओळख चांगलीच महागात पडली आहे. लग्नाचे अमिष दाखवून महिलेची 73 लाख 59 हजार 530 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार जून 2021 ते 13 जुलै 2021 या कालावधीत वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

याप्रकरणी पीडित 35 वर्षीय आयटी अभियंता महिलेने बुधवारी (दि. 13) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ रावी या व्यक्तीसह 18 बँक खाते धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आयटी अभियंता म्हणून आयटी कंपनीत नोकरीला आहे. दरम्यान लग्नासाठी फिर्यादी महिलेने विविध अॅप्सवर सर्चिंग सुरू केले. त्यात टिंडर डेटिंग अॅपवरून एस. रवी नावाच्या प्रोफाइलधारकाशी फिर्यादीची ओळख झाली. त्यानंतर एस. रवी याने त्याचा व्हाॅटसअॅप क्रमांक दिला. त्यावर त्याने सिद्धार्थ रावी नाव सांगितले. तसेच आणखी एक व्हाॅटसअॅप क्रमांक देऊन जेनी रवी नाव सांगितले. त्यानंतर फिर्यादीशी ओळख वाढवून विश्वास संपादन केला तसेच फिर्यादीशी लग्न करण्याचे व भारतात येऊन स्थायिक होण्याचे आमिष दाखविले.

दरम्यान, रावी याने फिर्यादी महिलेला महागडे गिफ्ट पाठवून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीला भेटण्यासाठी भारतात आल्याचे सांगितले. त्याच्याकडे एक कोटी रुपयांची मोठी रक्कम असल्याने त्याला दिल्ली विमानतळावर कस्टम ऑफिसरने पकडले असल्याचे त्याने फिर्यादी महिलेला सांगितले. ती मोठी रक्कम सोडविण्यासाठी वेगवेगळे चार्जेस, दंड, जीएसटी तसेच इतर अनेक कर भरायचे आहेत, अशी विविध कारणे सांगितली. त्यानंतर वेगवेगळ्या बँकांचे खाते नंबर देऊन त्यावर फिर्यादीला 73 लाख 59 हजार 530 रुपये भरण्यास भाग पाडले.

फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर फिर्यादी महिलेने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे अर्ज करून तक्रार केली. त्यानुसार चौकशी करून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.