Pune News : मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन तरुणीच्या हातात कोयता

एकावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज : कुख्यात गुन्हेगार सनी हिवाळे खून प्रकरणात सामील असल्याच्या संशयावरून एका अल्पवयीन तरूणीने 19 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला केला. हडपसर परिसरातील काळेपडळमध्ये रविवारी हा प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तरुणीसह चौघेजण अल्पवयीन आहेत. 

विठ्ठल धनंजय चौगुले (वय 19), ऋषिकेश उर्फ जंगल्या भारत पांचाळ (वय 20) आणि चैतन्य तुळशीराम कराड (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर 17 वर्षीय तरुणीसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चेतन प्रविण जगताप (वय 19) याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

एप्रिल महिन्यात सनी हिवाळे याचा हडपसर परिसरात निर्घृण खून करण्यात आला होता. सनी हिवाळे हा सराईत गुन्हेगार असून नुकताच तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. दरम्यान या प्रकरणातील अल्पवयीन तरुणी ही सनी हिवाळे याची मैत्रीण आहे. फिर्यादी तरुण हा काळेपडळ परिसरातील फ्रुट स्टॉल वर थांबला असताना हि अल्पवयीन तरुणी इतर साथीदारांबरोबर त्या ठिकाणी कोयते घेऊन आली. त्यांना पाहून फिर्यादी दुकानात गेला आणि शटर लावून घेतले.

त्यानंतरही आरोपीने ‘तु सनीच्या मर्डरच्या कटात सामील होता, मी तुला जिवंत सोडणार नाही, आता मला कशाची भीती नाही तसेच जर कोणी मध्ये आला तर मी कोणाला सोडणार नाही’ असे म्हणून शटरवर कोयत्याने वार करून शटर उघडण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीचे आई-वडील त्याठिकाणी आले असताना त्यांना देखील मी तुम्हाला सगळ्याना मारून टाकणार आहे अशी धमकी देऊन तिथून निघून गेली. पोलीस उपनिरीक्षक ढावरे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.