Mithali Raj Retirement : मिताली राज निवृत्ती; महिला क्रिकेटच्या एका पर्वाचे राज्य समाप्त

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) – भारतीय महिला क्रिकेटची आणि जागतिक क्रिकेटमध्येही महिला क्रिकेट मधील विक्रमादित्य तेंडुलकर म्हणून ओळखली जाणारी भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि एक महान खेळाडू म्हणून ओळखली जाणाऱ्या मिताली राजने (Mithali Raj Retirement )  काल सर्व प्रकारच्या क्रिकेटच्या फॉरमॅट मधून आपली निवृत्ती जाहीर केल्याने एका मोठ्या पर्वाचे राज्य समाप्त झाले आहे.

वयाच्या केवळ 17 व्या वर्षी एकदिवसीय सामन्यात 7, तर कसोटी सामन्यात द्विशतक करणारी भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणारी, सर्वाधिक धावा करणारी, कर्णधार म्हणून खेळाडू म्हणून अनेक मानाचे पुरस्कार मिळवून आपला ठसा जागतिक क्रिकेटवर उमटवणारी मिताली वयाच्या 39 व्या वर्षी काल सर्वप्रकाच्या क्रिकेट फॉरमॅट मधून निवृत्त (Mithali Raj Retirement)  झाल्याने यापुढे भारतीय रसिकांना ती मैदानावर खेळताना दिसणार नाही.

जोधपूर येथे 3 डिसेंबर 1982 रोजी जन्मलेल्या मिताली राजने महिला क्रिकेट मध्ये आपल्या दैदिप्यमान कामगीरीने नक्कीच राज केलेले आहे. तिने 14 जानेवारी 2002 साली कसोटी क्रिकेटमध्ये तर 26 जून 1999 साली एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाकडून पदार्पण केले. त्यानंतर तीने निवृत्त होईपर्यंत आपले राज्य अबाधित ठेवले असे म्हटले तर त्यात काहीही गैर ठरणार नाही. तिने 12 कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले तर तब्बल 232 एकदिवसीय सामन्यात खेळून एक मोठाच विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Pimpri News : महिला बचत गटाचा सार्वजनिक शौचालय देखभालीचा नवी दिशा उपक्रम

एकदिवसीय सामन्यात 7805 धावा ठोकणारी ती जगातली पहिली आणि अजूनही एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. यात 7 शतके, तर 64 अर्धशतके सामील आहेत. हा ही एक मोठा भीमपराक्रमच आहे.तसेच 200 हून अधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा आणखी एक मोठा विक्रमही तिच्याच नावावर आहे. तिने 2004 साली भारतीय संघाचे नेतृत्व हाती घेतले ते त्यानंतर 18 वर्षे ते करत तब्बल 22 वर्षे नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलत आणखी एक संस्मरणीय कामगिरी आणि विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

एकदिवसीय सामन्यात सलग 7 अर्धशतक करण्याचा विक्रमही तिच्याच नावावर आहे. अलीकडच्या काळात प्रचंड लोकप्रिय झालेल्या टी-20 मध्येही तीने 2000 हून अधिक धावा करणारी पहिली महिला क्रिकेटर्स म्हणून विक्रमाच्या पुस्तकात आपले नाव सोनेरी अक्षरात गोंदवलेले आहे.महिला क्रिकेटला एक प्रकारचे ग्लॅमरही तिने मिळवून देण्यात मोठी कामगिरी केली, आपल्या संयत नेतृत्वाने तीने भारतीय संघाला जगभर ओळख मिळवून दिली.

मितालीचे वडील दोराईराज हे भारतीय विमान सेवेत नोकरीला होते, तर तिची आई लीला राज ही गृहिणी आहे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून क्रिकेट खेळायला सुरूवात केलेल्या मितालीने बघताबघता आपल्यातल्या नैसर्गिक गुणवत्तेने सर्वाना प्रभावीत केले आणि लवकरच रेल्वेच्या संघात स्थान मिळवून आपल्या नावाचा डंका दशोदिशात वाजवत निवडसमितीचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आणि वयाच्या 17 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळून पुढे तब्बल 23 वर्षे आपल्या अलौकिक कामगीरीच्या जोरावर जागतिक महिला क्रिकेट मध्ये अधिराज्य केले.

‘पद्मश्री’ या अतिशय मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या मितालीने आपल्या 23 वर्षाच्या दैदिप्यमान कारकीर्दीत अनेक मोठमोठे आणि प्रतिष्ठित पुरस्कार मिळवलेले आहेत, ज्यात 2003 सालचा अर्जुन पुरस्कार,पद्मश्री, विस्डेन लिडिंग फीमेल क्रिकेटपटू, खेलरत्न अवाॅर्ड अशा पुरस्कारांचा समावेश आहे. तिच्या नेतृत्वाखालीच भारतीय महिला संघ 2017 च्या विश्वकरंडक स्पर्धेत अंतीम फेरीत पोहचला होता, ज्यात तिच्या संघाला फक्त 9 धावांची मात मिळाल्याने भारतीय संघाला उपविजेता होता आले.

खेळाडू कितीही मोठा आणि महान असला तरी त्याला कधी न कधी कुठे तरी थांबावे लागतेच तसेच तिनेही काल आता बास म्हणत सर्व प्रकारच्या क्रिकेटच्या फॉरमॅट मधून निवृत्त (Mithali Raj Retirement) होण्याचा निर्णय घेत आपल्या चाहत्यांना हुरहूर लावली.
मात्र यापुढेही तिच्या अनुभवाचा आणि क्रिकेटच्या अभ्यासाचा फायदा भारतीय क्रिकेट संघाला होवो इतकीच अपेक्षा आणि तिला यापुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, आयुष्य लाभो इतकीच परमेश्वराकडे प्रार्थना!
(संकलन गुगल क्रोम)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.