Purushottam Maharaj : आई ही धैर्यमूर्ती, करुणामूर्ती आणि क्षमामूर्ती : पुरुषोत्तम महाराज

एमपीसी न्यूज – आई ही अपकाराची परतफेड उपकाराने करणारी धैर्यमूर्ती, करुणामूर्ती आणि क्षमामूर्ती आहे. मातृत्वाची महान देणगी तिला मिळाली आहे. तिच्या मातृत्वाची व्याख्या शब्दातीत आहे. परंतु सर्वांची काळजी घेता घेता ती स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही, असे प्रतिपादन हभप पुरुषोत्तम महाराज पाटील (Purushottam Maharaj) यांनी तळेगाव दाभाडे येथे केले. तळेगाव दाभाडे येथील जैन इंग्लिश स्कुलमध्ये शुक्रवारी (दि. 26) ‘मातृदिन’ सोहळा साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

जैन इंग्लिश स्कुलच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष अमिन खान, सल्लागार रमेश जाधव गुरुजी आदि उपस्थित होते.

प्रमुख वक्ते हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी ‘लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त l ऐसी कळवळयाची जाती l करी लाभाविन प्रिती l या संत तुकोबांरायांच्या अभंगाचा संदर्भ देत आई ही अपकाराची परतफेड उपकाराने करणारी धैर्यमूर्ती, करुणामूर्ती आणि क्षमामूर्ती असल्याचे सांगितले. मातृत्वाची महान देणगी तिला मिळाली असून तिच्या मातृत्वाची व्याख्या शब्दातीत आहे. परंतु सर्वांची काळजी घेता घेता ती स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज साऱ्या जगाची माऊली झाले, त्याप्रमाणे प्रत्येकीने होण्याचा प्रयत्न करावा. मुलांनीही आईला वेळ द्यावा, असे आवाहन त्यांनी (Purushottam Maharaj) केले.

शिल्पा रोडगे म्हणाल्या, की हल्लीच्या मातांनी स्वतःचाही विचार करून काळजी घेतली पाहिजे. कारण प्रत्येक मुलाची आई सशक्त असेल तरच भारत देश सशक्त राहील.

Khadki Cantonment Area : साखर वाटप करून वंदे मातरम संघटनेचे अनोखे आंदोलन

यावेळी शिल्पा रोडगे, ज्येष्ठ पत्रकार अमिन खान यांचा सत्कार संस्थेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रकाश ओसवाल, संचालक दिलीप वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

राकेश ओसवाल, किरण परळीकर, दिलीप पारेख, संकेत ओसवाल, प्रतीक म्हाळसकर हभप माऊली दाभाडे आणि पाहुण्यांच्या हस्ते शिष्यवृत्ती परीक्षेत देदीप्यमान यश मिळविलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार आणि दहा नशिबवान मातांना गौरविण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांला ‘श्यामची आई’ हे पुस्तक भेट म्हणून मोफत देण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्य शुभांगी भोईर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका अपूर्वा टकले व माध्यमिक विभागाच्या विजया शिंदे, शिक्षक, कर्मचारी वर्ग यांच्यासह विद्यार्थी आणि पालक माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रकाश ओसवाल यांनी केले. सूत्रसंचालन कविता फाकटकर आणि आरती पेंडभाजे यांनी केले. राकेश ओसवाल यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.