Pimpri News : महापालिकेच्या उप आयुक्त आशादेवी दुरगुडे होणार सह आयुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उप आयुक्त आशादेवी दुरगुडे या सह आयुक्त होणार आहेत. त्यांना सह आयुक्तपदी बढती देण्याचा प्रस्ताव 20 जानेवारी 2022 रोजी होणा-या महासभेसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. दुरगुडे यांना सह आयुक्त होण्याचा बहुमान मिळणार आहे.

पिंपरी महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे.  पालिकेच्या नवीन आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियमांना मंजुरी मिळाली आहे. तत्कालीन सह आयुक्त दिलीप गावडे अतिरिक्त आयुक्त होऊन सेवानिवृत्त झाले. त्यानंतर सुमारे दोन वर्षांपासून हे पद रिक्त होते. पालिका आस्थापनेवर सह आयुक्त पद शासन मंजूर असून पदोन्नतीसाठी रिक्त आहे.

सह आयुक्त हे पद पदोन्नतीने भरण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्नती समितीची 10 ऑक्टोबर 2021 रोजी बैठक झाली. उप आयुक्त पदावरील अधिका-यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्व, संगणक अर्हता आणि शिस्तंभग विषयक कारवाईचा तपशील पडताळला. त्यानुसार उप आयुक्त आशादेवी दुरगुडे यांनी सह आयुक्त पदावर बढती देण्यास पदोन्नती समितीने मान्यता दिली.

दुरगुडे यांना सह आयुक्तपदी बढती देण्याच्या प्रस्तावाला 7 जानेवारी 2022 रोजी विधी समितीनेही मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयातील न्यायप्रविष्ठ असलेल्या याचिकेमध्ये होणा-या अंतिम निर्णयाच्या  व शासन निर्णयाच्या अधिन राहून सेवाज्येष्ठतेनुसार रिक्त जागेवर पदोन्नती देण्यात येणार आहे.

तर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांना सह शहर अभियंता (स्थापत्य) या पदावर बढती देण्यात येणार आहे. पदोन्नती समितीने लडकत यांना सह शहर अभियंता पदावर बढती देण्याची शिफारस केली असून हा प्रस्तावही मान्यतेसाठी महासभेसमोर ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.