Chikhali Crime News : खंडणीसाठी ‘त्या’ आठ वर्षीय मुलाचा खून, 48 तासांत आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – चिखली येथे रविवारी (दि.17) आठ वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. गुंडा विरोधी पथकाने 48 तासांत याप्रकरणाचा छडा लावत मंगळवारी, दि.19) एका आरोपीला अटक केली. खंडणीसाठी मुलाचे अपहरण केले व त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची माहिती उघडकीस आली आहे.

बपील अहमद रईस लष्कर (वय 26, रा. हरगुडेवस्ती, कुदळवाडी, चिखली मुळगाव आसाम) असे अटक आरोपीचे नाव आहे.

लक्ष्मण बाबुराम देवासी (वय 8, रा. हरगुडे वस्ती, चिखली मुळगाव राजस्थान) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील 83 ठिकाणचे सीसीटीव्ही तपासणी करुन, तांत्रिक विश्लेषण करत संशयीत आरोपीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. आठ वर्षीय मुलाच्या आई वडिलांकडून एक लाख रुपये खंडणी मागण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण करुन त्याला पत्र्याच्या शेडमध्ये नेले. मुलगा आरडाओरडा करु लागल्याने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खुन केला. अशी कबुली आरोपीने दिली.

दरम्यान, आठ वर्षीय मुलाचा खून कोणत्या कारणातून झाला याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. पोलिसांनी केलेल्या तपासातून यावर पडदा पडला असून, खंडणीच्या मागणीसाठी खून केला असल्याचे उघडकीस आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.