Hinjawadi Crime News : बनावट आधारकार्ड बनवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – फोटो स्टुडिओ मध्ये आलेल्या एका व्यक्तीचे आधारकार्ड घेऊन त्याद्वारे बनावट आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 24) दुपारी हिंजवडी येथे घडला.

अक्षय रवींद्र जाधव (वय 24, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस नाईक जालिंदर गोरे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय जाधव याचे ग्रामपंचायत बिल्डिंग हिंजवडी येथे कृष्णा फोटो स्टुडिओ नावाचे दुकान आहे. आरोपी अक्षय याने त्याच्या मोबाईल फोन मध्ये एका व्यक्तीच्या आधार कार्डचा फोटो काढला. त्या आधार कार्ड वरील आधार क्रमांक वापरून त्याने बनावट आधार कार्ड तयार केले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फोटो स्टुडिओ मधील संगणकातील सर्व माहिती डिलीट केली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.