Dehuroad News : भटक्या मादी श्वानाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – किवळे परिसरात एका भटक्या मादी श्वानाला एकाने बेदम मारहाण केली. त्यामध्ये श्वान गंभीर जखमी झाला. याप्रकरणी मारहाण करणा-या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 29) दुपारी साडेपाच वाजता घडली असून याबाबत शुक्रवारी (दि. 31) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नलिनी चक्रवर्ती (वय 38, रा. किवळे, देहूरोड) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजेंद्र रेड्डी (रा. किवळे, देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथे भटके श्वान आहेत. त्यातील एका मादी श्वानाला आरोपी राजेंद्र याने काठीने बेदम मारहाण केली. त्यात श्वान गंभीर जखमी झाला. याबाबत राजेंद्रच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नलिनी चक्रवर्ती यांनी सांगितले की, किवळे परिसरात असलेल्या सुमारे 50 ते 60 भटक्या श्वानांची देखभाल आणि त्यांच्या जेवणाची मी काळजी घेत आहे. मंगळवारी दुपारी साडेपाच वाजता मी घरासमोर असलेल्या भटक्या श्वानांना खायला द्यायला गेले, तेंव्हा एक मादी श्वान गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे आढळले. श्वानाचे डोके फुटले होते, अंतर्गत आणि बाह्य अंगावर रक्तस्त्राव होत होता.

त्याबाबत आसपास चौकशी केली असता राजेंद्र रेड्डी यांनी मारल्याचे समजले. याबाबत रेड्डी यांना जाब विचारण्यासाठी नलिनी गेल्या असता राजेंद्र याने त्यांचा गळा दाबला, हात पिरगाळला आणि फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला असल्याचे नलिनी यांनी सांगितले.

नलिनी यांनी तक्रार देण्यासाठी नियंत्रण कक्षाला फोन केला असता बराच वेळ फोन व्यस्त लागला. त्यानंतर देहूरोड पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी याबाबत तक्रार दिली. बुधवारी श्वानाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गुरुवारी नलिनी यांची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.