Sangvi News : ‘आम्ही स्नॅपडील मधून बोलतोय, तुम्हाला कार बक्षीस मिळाली आहे

कार बक्षिसे देण्याच्या बहाण्याने 20 लाख 88 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फसवणुकीचा जमतारा पॅटर्न चांगलाच पसरला आहे. अडाणी, अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षित नोकरदारांपर्यंत सर्व स्तरातील लोक त्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. मोठमोठी प्रलोभने दाखवून पैसे उकळले जात आहेत. सांगवी परिसरात एका नोकरदाराला तब्बल 20 लाख 88 हजार 350 रुपयांचा गंडा घातला आहे. ‘आम्ही स्नॅपडील मधून बोलत आहोत. तुम्हाला एसयूव्ही कार बक्षीस मिळाली आहे’ असे सांगून हा गंडा घालण्यात आला आहे.

अनिलकुमार शीतलप्रसाद तिवारी (वय 51, रा. पिंपळे गुरव) अशी फसवणूक झालेल्या नोकरदार व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एक महिला आरोपी, दयाशंकर जगदंबा प्रसाद मिश्रा आणि यंकप्पा अशा तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 28 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत घडला आहे. आरोपींनी फिर्यादी तिवारी यांना फोन करून ‘आम्ही स्नॅपडीलमधून बोलत आहोत. तुम्ही आमच्या कंपनीचा ऑक्सीमीटर घेतला आहे. तुम्हाला महिंद्रा कंपनीची एसयूव्ही 500 कार बक्षीस मिळाली आहे.’ असे सांगितले.

कार लागल्याच्या आनंदात तिवारी यांच्याकडून आरोपींनी एसबीआय बँकेचे खातेधारक के बालाकृष्ण, झरना मिश्री, तोबुंग पर्टीन, प्रवीण शर्मा आणि इंडियन ओव्हरसिस बँकेचे खातेधारक संतोष वर्मा यांच्या बँक खात्यावर वेळोवेळी पैसे पाठवण्यास लावले. आरोपींनी वरील कालावधीत तिवारी यांच्याकडून तब्बल 20 लाख 88 हजार 350 रुपये घेतले.

तिवारी यांच्याकडून पैसे घेऊन आरोपींनी त्यांना कार दिली नाही. तसेच त्यांची घेतलेली रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. याबाबत भारतीय दंड विधान कलम 420, 34, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.