Chinchwad News : उद्योगनगरीत दर चार दिवसाला होतोय एक खून; वर्षभरात तब्बल 83 खून

एमपीसी न्यूज – मागील वर्षी (सन 2021) थेट 302 (खून) च्या 83 घटना घडल्या. हे प्रमाण प्रत्येक चार दिवसाला एक खून एवढे भयानक आहे. हेच प्रमाण सन 2020 मध्ये साडेपाच दिवसाला एक खून असे होते. उद्योगनगरीला गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांसह एकूण गुन्ह्यांची आकडेवारी वाढली आहे.

किरकोळ कारणांवरून होणारे भांडण आणि त्यातून निर्माण होणारी चीढ हे सर्वाधिक खुनाचे कारण आहे. वैयक्तिक भांडण, एकमेकाकडे रागाने बघितल्यामुळे भांडण होऊन खून करणे. आर्थिक देवाण-घेवाण, दारूच्या नशेत, पूर्ववैमनस्यातून तसेच लैंगिक कारणावरून खून झाले आहेत.

जानेवारी ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत 76 खुनाचे गुन्हे दाखल असल्याची आकडेवारी आहे. डिसेंबर महिन्यात सात खुनाच्या घटना घडल्या. वर्षभरात घडलेल्या 83 पैकी 77 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

डिसेंबर महिन्यात शहराने टोळीयुद्धाचा थरार अनुभवला. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांनी एका सराईत गुन्हेगारावर भर दिवसा गोळ्या झाडून त्याचा खून केला. त्यानंतर आरोपी पोलिसांना आव्हान देऊन पसार झाले. या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस आयुक्तांना जावे लागले. या गुन्ह्यातील आरोपींना पकडताना आरोपी आणि पोलीस यांच्यात गोळीबार देखील झाला. शेवटी पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

चाकण येथे गोळ्या झाडून एक खून झाला. गोळीबार करून खून करण्याच्या घटना वाढत असल्याने गुन्हेगारांकडे ही हत्यारे येतात कुठून, असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित झाला.

खुनासारखा अत्यंत गंभीर गुन्हा करण्यासाठी अगदी किरकोळ कारणे सुद्धा पुरेशी ठरत आहेत. गाडी बाजूला घेण्यावरून, गाडीचा धक्का लागल्याने, खुन्नसने बघितल्याने, मानलेल्या बहिणीच्या मांडीला हात लावल्याच्या शुल्लक कारणांवरून खून झाले आहेत.

यात अत्यंत गंभीर बाब ही की, खुनासह अन्य विविध गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग. मिसरूड न फुटलेली लहान मुलं गुन्हेगारीकडे वळू लागली आहेत. हा शहराच्या विकासाला झालेला कर्करोग आहे. यावर मंथन होऊन ठोस तोडगा काढणे आवश्यक आहे.

वर्षभरात झालेले खून –
जानेवारी – 2
फेब्रुवारी – 8
मार्च – 4
एप्रिल – 7
मे – 5
जून – 4
जुलै – 5
ऑगस्ट – 12
सप्टेंबर – 14
ऑक्टोबर – 6
नोव्हेंबर – 8
डिसेंबर – 7

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.