Pimpri News: प्रशिक्षण न देताच महिलांच्या खोट्या स्वाक्ष-या, भाजप, प्रशासनाच्या वरदहस्ताने 57 कोटींचा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचाच आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागाअंतर्गत महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी नियुक्त केलेल्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था या ठेकेदार एजन्सीने भाजप पदाधिकारी आणि प्रशासनाच्या मदतीने 2020-21 या वर्षात 57 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. कोरोना काळात जमावबंदी असताना संस्थेने तब्बल 61 हजार 155 महिलांना प्रशिक्षण दिल्याचा दावा केला. प्रत्यक्षात महिलांना कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांच्या खोट्या स्वाक्ष-या केल्याचे ‘फॉरेन्सिक’ अहवालातून समोर आले असल्याचे भाजप नगरसेविका माया बारणे यांनी आज (बुधवारी) सांगितले. या भ्रष्टाचाराची निपक्ष:पातीपणे चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.

पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेला अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे उपस्थित होते. नगरसेविका माया बारणे म्हणाल्या, महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी महापालिकेने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थ या खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. महिलांच्या कागदपत्रांचा गैरवापर करत या संस्थेने खोट्या स्वाक्ष-या करुन महिलांना प्रशिक्षण दिल्याचे दाखविले आहे. महिलांना प्रशिक्षण न देताच कोट्यवधी रुपयांचे बील महापालिकेकडून वसूल केले.

कोरोना काळात जमावबंदी असताना संस्थेने तब्बल 61 हजार 155 महिलांना प्रशिक्षण दिल्याचा दावा केला. त्याची माहिती मागितली असता नागरवस्ती विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर, आयुक्त राजेश पाटील यांनी देण्यास टाळाटाळ केली. सत्ताधारी भाजपच्या दबावामुळे आयुक्त माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्याकडे सुनावणी मागितली पण दिली नाही. प्रशासन दाद देत नसल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली. अजितदादांनी आदेश दिल्यानंतर आयुक्त पाटील माहिती द्यायला लागले. त्यासाठी मला 53 हजार रुपये भरण्यास सांगितले. महापालिकेकडून माहिती मिळाल्यानंतर आम्ही सर्वेक्षण केले. नागरवस्ती विभागाकडून ज्या महिलांची यादी मिळाली होती. त्या महिलांचा शोध घेतला. त्यापैकी अनेक महिलांनी प्रशिक्षण घेतले नसल्याचे सांगितले. ज्या महिलांच्या हजेरीपत्रकावर स्वाक्ष-या आहेत. त्यातील 10 स्वाक्ष-या तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविल्या. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून प्रत्यक्ष महिलांनी केलेल्या स्वाक्ष-या आणि हजेरीपत्रकावरील स्वाक्ष-यांमध्ये मोठी तफावत आढळून आली. त्यामुळे या स्वाक्ष-या खोट्या असल्याचे उघड झाले असल्याचेही त्या म्हणाल्या.

आमची कागदपत्रे घेऊन जातात. स्वाक्ष-या करुन घेतात मात्र पुन्हा आम्हाला कोणतेही प्रशिक्षण दिले जात नसल्याचा आरोप महिलांनी केला. एका महिलेला हेअर स्पा कोर्सच्या नावाखाली दोन दिवस हात धुण्याचे प्रशक्षिण दिले. प्रमाणपत्र मात्र 90 दिवस अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण केल्याचे दिले. उच्चभ्रु घरातील महिलांना कागदोपत्री मोलकरणीचे प्रशिक्षण दिल्याचे दाखविले. यातून संस्थेची बनावटगिरी स्पष्ट होत आहे. अशा प्रकारे या संस्थेने सत्ताधारी भाजपला हाताशी धरुन कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला. कागदोपत्री 57 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार दिसत असला तरी प्रत्यक्षात 150 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे. एवढा मोठा भष्ट्राचार असतानाही सत्ताधारी भाजपमधील कोणताही पदाधिकारी बोलत नाही. याचाच अर्थ यामध्ये सत्ताधा-यांसह अधिका-यांचे लागेबांधे असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोपही नगरसेविका बारणे यांनी करत भाजपला घरचा आहेर दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.