Pimpri News: महापालिका शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार  

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने यावर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे, असे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले.  शासनाच्या कोविड 19 संदर्भातील नियमावलीचे पालन करून शिवजयंतीचे कार्यक्रम साजरे करण्यासाठी महापालिका प्रभावी नियोजन करेल असेही त्या म्हणाल्या.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महानगरपालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येत असते.  त्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी महापालिका पदाधिकारी, अधिकारी तसेच शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत आज महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

या बैठकीस उपमहापौर हिराबाई घुले, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी नगरसदस्य मारुती भापकर, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, विलास देसले, उपअभियंता संजय खरात,  शिवजयंती उत्सव समिती भक्ती शक्तीचे जीवन बोराडे, अजय पाताडे,  जे. सी. यादव, सतिश काळे, मारुती लोखंडे, धनाजी येळकरपाटील, अभिषेक म्हसे,  गणेश सरकटेपाटील, अभिजीत पाटील, दादासाहेब पाटील, सागर तापकीर, अतुल वर्पे, निलेश शिंदे,          शिवस्मारक प्रतिष्ठाणचे सुरेंद्र पासलकर आदी उपस्थित होते.

कोविड काळात शहरातील विविध संघटना आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाबद्दल आणि योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करुन महापौर ढोरे म्हणाल्या, अद्याप कोरोनाचे सावट पूर्णपणे दूर झालेले नाही. त्यामुळे   शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोविड संदर्भातील नियमावलीचे पालन करुन शिवजयंती साजरी करण्यासाठी चांगल्या प्रकारे नियोजन महापालिकेच्या वतीने केले जाणार आहे.  यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन महापौर ढोरे यांनी केले.

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांची रंगरंगोटी तसेच स्थापत्य आणि विद्युत विषयक कामे तातडीने पूर्ण करण्याचे तसेच पुतळा परिसर स्वच्छ आणि सुशोभित करावे. महापुरुषांच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह शालेयस्तरावर निबंध, वक्तृत्व स्पर्धा घेण्याचे निर्देश देखील महापौर ढोरे यांनी शिक्षण विभागाला दिले.

बैठकीत उपस्थित प्रतिनिधींनी शिवजयंती विचार प्रबोधन पर्वाच्या अनुषंगाने विविध सूचना केल्या.  शालेय स्तरावर शिवरायांच्या विचारावर आधारित निबंध, वक्तृत्व स्पर्धांचे वेळेत नियोजन करावे, शिवकार्याचा प्रचार प्रसार करणा-या व्यक्तींचा सत्कार करण्यात यावा, नामांकित व्यक्तींच्या व्याख्यानांचे तसेच परिसंवादाचे आयोजन करावे, शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम घ्यावा, शिवरायांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावेत आदी सूचना करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.