Pimpri News: राजकीय आरोप प्रत्यारोपांची ही वेळ नाही, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत- अजित पवार

शिवाजीनगर येथे 800 बेडचे जम्बो हॉस्पिटल, मगर स्टेडियमवरील हॉस्पिटल आणि आता ऑटो क्लस्टर येथे 200 खाटांचे रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले.

एमपीसी न्यूज – कोरोनाविरुद्धाची लढाई सर्वांनी मिळून एकजुटीने लढायची आहे. त्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मी एका मंचावर एकत्र आलो आहोत. आम्ही एकत्र येणार असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमधून दाखवल्या जात आहेत. प्रत्येकाची राजकीय मते वेगवेगळी असू शकतात. पण ही ती वेळ नाही. या संकटाच्या काळात आरोप प्रत्यारोप न करता एकता टिकवून ठेवणे गरजेचे आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये कोविड रुग्णालयाची उभारणी केली आहे. त्याचे आज (दि.28) उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार बोलत होते.

कार्यक्रमासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील, महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पालिकेचे आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनाचा रविवारपासून तिसरा कार्यक्रम आहे. शिवाजीनगर येथे 800 बेडचे जम्बो हॉस्पिटल, मगर स्टेडियमवरील हॉस्पिटल आणि आता ऑटो क्लस्टर येथे 200 खाटांचे रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. ऑटो क्लस्टर येथे उभारण्यात आलेल्या रुग्णालयाची उभारणी पालिकेने राज्य शासनाची मदत न घेता स्वतः केली आहे.

अनेक सण उत्सव साजरे करताना बंधने घालावी लागत आहेत. कष्टक-यांची, वेगवेळ्या जाती धर्मांच्या लोकांची नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन उत्तम काम करत आहे. लवकरात लवकर कोरोनाच्या संकटातून सर्वांना बाहेर काढ, असे आपण गणरायाला साकडे घालत असल्याचेही पवार म्हणाले.

कोरोना साथीच्या काळात सरकारी हॉस्पिटल कमी पडायला लागली म्हणून खासगी हॉस्पिटल सरकारने ताब्यात घेतली. ती सुद्धा कमी पडू लागल्याने नव्याने हॉस्पिटलची उभारणी करण्यात येत आहे.

कोणत्याही रुग्णाला बेड कमी पडणार नाही. यासाठी हा सर्व प्रयत्न सुरु आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र लेखापरीक्षक नेमण्यात आले आहेत. भरारी पथकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांनी दिलेली 74 लाखांची वाढीव बिले कमी करण्यासाठी या पथकांनी प्रयत्न केले आहेत.

ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी पुण्यात घेण्यात आली. ही भारतातील पहिली मानवी चाचणी आहे. यामुळे लस लवकर येईल अशी आशा आहे. जगातील सर्व शास्त्रज्ञ लस लवकर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

अनेकजणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. अनेक राजकीय पदाधिका-यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. प्रत्येकाने दक्षता घेतलीच पाहिजे. प्रशासनाने काळजी घेतली पण जनतेने काळजी घेतली नाही, तर अडचणीचे ठरणारे आहे.

पालिका प्रशासन, पोलीस, स्वयंसेवी संस्था कोरोनाविरोधात लढत आहेत. शहरी भागासह ग्रामीण भाग देखील आपलाच आहे, ही भावना ठेऊन काम करा.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहराचा आलेख मागील काही दिवसांमध्ये वर आला होता. हा आलेख खाली उतरण्यासाठी सर्वजण प्रयत्न करूयात. गणेशोत्सवात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची काळजी घ्या. कुठल्याच रुग्णालयात जाण्याची कुणावरही वेळ येऊ नये, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली. काळजी घ्या, सुरक्षित रहा, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी पिंपरी-चिंचवडकरांना दिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ऑटो क्लस्टर येथे 200 खाटांचे रुग्णालय सुरु होत आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे. राज्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे. राज्यात रेट ऑफ इन्फेक्शन 19 टक्के आहे. त्यासाठी चाचण्या वाढवणे, विलगीकरण करणे, आवश्यकता असल्यास रुग्णालयात दाखल करणे अशा उपाययोजना करणे गरजेचे आहे. या स्ट्रॅटेजीच्या आधारावरच कोरोनावर नियंत्रण आणता येईल.

पिंपरी-चिंचवड शहराचा रिकव्हरी रेट 85 टक्के आहे. हा रेट अतिशय चांगला आहे. मृत्यूचा दर एक टक्क्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पालिकेने आजवर कोरोनासाठी जे काम केले आहे, ते खूप चांगले आहे. कोरोनाची लस येईपर्यंत येत्या काळात आणखी चांगले काम करावे लागेल. सगळेजण मिळून कोरोना विरुद्धची ही लढाई लढू.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, “अवघ्या 14 दिवसांत शहरवासियांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाची साथ आल्यानंतर वायसीएम रुग्णालय पूर्णपणे या कोरोनासाठी देण्यात आले. शहरवासीयांना आरोग्य सेवा कमी पडू नये, यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे पालिका प्रशासनाकडून नागरिकांना वेळोवेळी आवाहन केले जात आहे. पालिका आणि वैयक्तिक स्तरावर सगळे प्रत्येक गरजू नागरिकाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

नामदेव ढाके म्हणाले, “केवळ 14 दिवसांत 200 खाटांचे कोविड हॉस्पिटल ऑटो क्लस्टर येथे उभारण्यात आले आहे. याचा अभिमान आहे असे सांगत त्यांनी महापालिकेने केलेल्या कोरोनासाठीच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. हायरिस्क संपर्कातील नागरिकांना शोधून त्यांची चाचणी केली जात आहे. पालिका प्रशासन उत्तम काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ऑटो क्लस्टर येथे उभारण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयाची माहिती देणारी चित्रफित कार्यक्रमात दाखवण्यात आली. पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.