Pune News : वाजवा रे वाजवा ! यंदा गणेशोत्सवात निर्बंध नाहीत

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे मागील दोन वर्ष निर्बंधात गणेशोत्सव साजरा करावा लागला होता. यंदा मात्र तशी परिस्थिती नाही.राज्य सरकारनेच यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर कुठल्याही प्रकारची निर्बंध नसतील. मिरवणुकीत ढोल ताशा पथकांच्या संख्येवर देखील मर्यादा नाही.असे पुणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात होणार यात शंका नाही.

पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गणेशोत्सवाच्या तयारीबद्दल सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेत गणेशोत्सवात पोलिसांची भूमिका काय असेल याविषयी माहिती दिली.

अमिताभ गुप्ता म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाचा उत्सव निर्बंधमुक्त होणार असल्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे यंदाचा उत्सव हा निर्बंध मुक्त असेल.मात्र ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवा दरम्यान वाहतूक कोंडी, गर्दीवर नियंत्रण आणि गणेश भक्तांना दर्शनासाठी चांगली सुविधा देण्यात येणार आहे.याशिवाय गुन्हेगारी कृत्यांवर पोलिसांची बारकाईने नजर राहणार आहे.

दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळासमोर किती ढोल ताशा पथके असावीत यावरून वादविवाद होत असतात.यावेळी मात्र तसे नाही. ढोल ताशा पथकावर कुठलेही निर्बंध नाही. परंतु ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. ढोल ताशा पथके किंवा स्पीकरने आवाजाची मर्यादा ओलांडल्यास त्यांच्यावर कारवाईक करण्यात येईल.याव्यतिरिक्त विसर्जन मिरवणुकीत अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष तयारी केली आहे, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.