Pune News : PMRDA चा निकाल आला! भाजप-राष्ट्रवादीचा विजय तर काँग्रेसच्या एकमेव उमेदवाराचा पराभव

एमपीसी न्यूज – पुणे महानगर नियोजन समितीच्या (PMRDA) निवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झालाय. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व म्हणजे 14 उमेदवार निवडून आले. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 तर शिवसेनेच्या एका उमेदवाराचा विजय झाला आहे. तर काँग्रेस उमेदवाराला मात्र मोठा धक्का बसला आहे. नागरी गटातून काँग्रेसचे एकमेव उमेदवार चंदुशेठ कदम यांना पराभव स्वीकारावा लागला.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे महानगर नियोजन समितीच्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड नागरी क्षेत्रात असलेल्या 22 जागांसाठी ही निवडणूक झाली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील संख्याबळानुसार भाजपचे 14 राष्ट्रवादीचे 7 आणि शिवसेनेचा एक सदस्य मतांच्या कोट्यानुसार निवडुन आले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील काँग्रेसचे संख्याबळ पाहता एकही सदस्य निवडून येणे शक्य नव्हते. कारण पुण्यात काँग्रेसचे दहा नगरसेवक आहेत तर पिंपरीत एकही नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी कॉंग्रेसला ग्रामीण गटातून एक जागा देऊ केली होती. मात्र काँग्रेसकडून हा प्रस्ताव धुडकावण्यात आला आणि पुण्यातील नगरसेवक चंदूशेठ कदम यांचा उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता मतदान घ्यावे लागले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.