Nigdi News : पोलीस आयुक्तांचे वेशांतर, गाफिल आरोपीच्या स्वत: आवळल्या मुसक्या

सायबर क्राईमचा माणूस असून जमिनीचे मॅटर सोडवतो अशी केली होती आरोपीने बतावणी; दोन महिला आरोपीसह तीन जणांना अटक, दोन फरार

एमपीसी न्यूज – ‘आम्ही जमिनीची प्रकरणे सोडवतो, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आणि मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यसोबत चांगली ओळख आहे,’ अशी बतावणी करून खंडणी मागितली. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी स्वत: या कारवाईत सहभागी होत, वेशांतर करून भक्ती शक्ती चौक, निगडी येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचला, आणि दोन महिला आरोपी यांच्यासह तिघांना अटक केली. शनिवारी (दि.26) रात्री 9 ते 9.30 दरम्यान ही कारवाई केली.

रोशन संतोष बागुल (वय 22), गायत्री रोशन बागुल (वय 22, रा. देव इंद्रायणी सोसायटी देहुगाव, मुळगाव दिंडोरी, नाशिक) आणि पुजा विलास माने (वय 22, रा. देव इंद्रायणी सोसायटी देहुगाव, मुळगाव हडपसर, पुणे) असे अटक आरोपींची नावे आहेत. तर, ज्ञानेश्वर (पूर्ण नाव माहिती नाही) आणि अजित हाके (रा. त्रिवेणीनगर) हे दोन आरोपी फरार आहेत.

विन्सेंट अलेक्झांडर जोसेफ (वय 52, ताम्हाणे वस्ती, मोरे वस्ती, चिखली) यांनी याबाबत देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे विन्सेंट जोसेफ यांच्या खोलीत भाड्याने रहायला होते. आरोपी रोशन याने तो सायबर क्राईमचा माणूस असून महाराष्ट्र पोलीस हेल्पर असे बनावट ओळखपत्र तयार केले. आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून ‘आम्ही जमिनीची प्रकरणे सोडवतो, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आणि मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यसोबत चांगली ओळख आहे,’ अशी बतावणी केली. फिर्यादी यांचा जमिनीचा मॅटर सोडवून देतो पण त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगितले. फिर्यादी यांनी पोलिसांत धाव घेत याची सर्व माहिती पोलिसांना दिली.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी स्वत: या कारवाईत सहभागी होत वेशांतर केले आणि पोलिसांची टीम तयार केली. फिर्यादी यांनी आरोपींना पैसे घेण्यासाठी पुना गेट, भक्ती शक्ती चौक येथे बोलवले. पोलीस आयुक्त आणि आरोपी जवळच बसले होते, तरीही आरोपीने आयुक्तांना ओळखले नाही. पैसे स्विकारल्यानंतर आयुक्तांनी आरोपीला पकडले. यासह दोन महिला आरोपींना देखील अटक केली आहे. तर, दोन आरोपी घटनास्थळावरून फरार आहेत.

आरोपीला देण्यासाठी नकली पैशाचे बंडल तयार केले होते, ते आरोपीच्या खिशातून बाहेर काढण्यात आले. आरोपी जवळ सायबर क्राईम, महाराष्ट्र पोलीस हेल्पर असे लिहलेले बनावट ओळखपत्र सापडले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

पाहा नेमकं काय घडलं?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.