Pune : आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांचा लागणार कस

एमपीसी न्यूज – सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे (Pune ) वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चारही लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा चांगलाच कस लागणार आहे. कारण, यावेळी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच बंड पुकारले आहे. शरद पवार (काका) विरोधात अजित पवार (पुतण्या) जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. शरद पवार यांनी इंडिया आघाडीत समावेश केला आहे. तर, अजित पवार यांनी मोदींचे गुणगान करीत भाजपला पाठिंबा दिला आहे.

सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काका – पुतण्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. दर वेळी सोपी वाटणारी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक वाटते तेवढी आता सोपी राहिली नाही. या मतदारसंघात खुद्द अजित पवारच आपला उमेदवार देणार आहेत. त्यामुळे शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना विजयी करण्यासाठी तळ ठोकून राहण्याशिवाय पर्याय नाही.

Pune : कसबा मतदारसंघातील विविध मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान

यापूर्वी भाजप बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार द्यायची, यावेळी जागावाटपात हा मतदारसंघ अजित पवार यांच्या वाट्याला येणार आहे. पवार यांच्याकडून आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. शिरूर मतदारसंघात डॉ. आमोल कोल्हे यांचा पराभव करणार म्हणजे करणार, अशी खूणगाठ अजित पवार यांनी बांधली आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता लागली आहे. पार्थ पवार यांनी या मतदारसंघात जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे.

तर, शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना (शिंदे गट) तर्फे जोरदार तयारी सुरू केली आहे. पुणे हा मतदारसंघ नेहमी प्रमाणेच काँग्रेसला मिळणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. वरील चारही मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे लोकसभा (Pune ) निवडणुकीत दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.