Pune News: आम्हालाही दिवाळी बोनस, कोविड भत्ता द्या; कंत्राटी कर्मचा-यांची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना काळात आम्ही जीवाची पर्वा न करता काम केले. शहरातील कोरोना नियंत्रणात आणण्यात आमचेही मोठे योगदान आहे. प्रशासनाने कायमस्वरुपी कर्मचा-यांप्रमाणे आम्हाला दिवाळी बोनस आणि कोविड भत्ता द्यावा, अशी मागणी पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांनी केली आहे.

आम्ही अत्यावश्यक सेवेत कामा करणारे 7 हजार 902 कंत्राटी कर्मचारी आहोत. आमची दिवाळी कडू करु नका अशी विनंती या कर्मचा-यांनी केली.याबाबत स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी, शिक्षकत्तेर कर्मचारी (रोजंदारी सेवकांसह) यांना दिवाळी बोनस, सानुग्रह अनुदान आणि कोविड भत्ता देण्याचा निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत 6 ऑक्टोबर रोजीच्या बैठकीत झाला.

सद्यस्थितीत बोनस बाबतीत मागील 5 वर्षाचा करार संपुष्टात आला होता. त्यास सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. असे असताना पूर्वीच्या करारनाम्यानुसार ज्या कंत्राटी कर्मचा-यांना बोनसचा लाभ मिळत होता. त्यांना मात्र या करारातुन वगळ्यात आले आहे.

पुणे महापालिकेत 7 हजार 902 कंत्राटी कर्मचारी विविध खात्यात कार्यरत आहेत. अत्यावश्यक सेवेतील आरोग्य, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, सुरक्षा विभागात कार्यरत आहेत. या कर्मचा-यांनी कोरोना काळात जीवाची बाजी लावून अहोरात्र काम केले. त्यातील काहींना आपले प्राण सुद्धा गमवावे लागले. असे असताना महामारीच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. ज्या कंत्राटी कर्मचा-यांमुळेच कोरोनाचा अटकाव करण्यात महापालिका प्रशासनाला यश मिळाले. त्यांचाच महापालिकेला विसर पडला आहे.

पूर्वीच्या करारास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असताना, मागील करारात ज्या कंत्राटी कर्मचा-यांना बोनसचा लाभ मिळात होता. त्यांची महापालिकेकडून बोळवण करण्यात येत आहे. कंत्राटी कर्मचा-यांच्याबाबतीत महापालिका दुजाभाव करत आहे. समान काम समान वेतन धोरणाला हरताळ फासत आहे. तो अत्यंत चुकीचा असून महापालिकेची ही कृती म्हणजे ‘गरज सरो व वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे आहे. कंत्राटी कर्मचा-यांना दिली जाणारी सापत्न वागणूक अन्यायकारक आहे. या कर्मचा-यांनाही दिवाळी बोनस आणि कोविड भत्ता देण्यात यावा अशी मागणी कंत्राटी कर्मचा-यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.