Pune News : पुण्यात नदी संवर्धनासाठी साखळी उपोषणानंतर मूकमोर्चा

एमपीसी न्यूज : नदी संवर्धनासाठी केलेल्या साखळी उपोषणाला (Pune News) 200 दिवस पूर्ण झाल्याने काल (बुधवारी) शहरातील नदीप्रेमी कार्यकर्ते व नागरिकांनी गरवारे महाविद्यालय ते पुणे महापालिका भवन असा मूक मोर्चा काढला होता.

सांडपाणी व राडारोडा टाकून पुण्यातील मुळा-मुठा यांची गटारगंगा झाली आहे. त्याचा फटका रविवारी (दि.11) झालेल्या मुसळधार पावसातही पुणेकरांना बसला आहे. नदी विकासाच्या नावाखाली नद्यांचे होणारे काँक्रिटीकरण,त्यात सोडले जाणारे सांडपाणी, कचरा याविरोधात नदी प्रेमींनी साखळी उपोषण सुरु केले होते. त्या उपोषणाला 200 दिवस पूर्ण झाले. तरी महापालिका प्रशासनाला जाग आली नाही म्हणून हा मूक मोर्चा काढण्यात आला. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिक व  पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्था यात सहभागी झाल्या होत्या.

आपली नदी स्वच्छ व सुंदर रहावी यासाठी पुणेकरांनी यात सहभागी व्हावे,(Pune news) असे आवाहन करण्यात आले आहे. गरवारे महाविद्यालयापासून निघून हा मूकमोर्चा सायंकाळी महापालिका भवन येथे पोहचला. तेथे मोर्चाची सांगता झाली.

Post Office : पुर्णानगर येथे पोस्ट ऑफिस आपल्या दारी उपक्रमाचे उद्घाटन

नदीकाठ सुधार प्रकल्प

पुण्यातील नदया सध्या मृतावस्थेत असताना पुणे महानगरपालिकेने मात्र त्यांना सजवण्याचा घाट घातला आहे. पुणे हे अत्यंत पूरप्रवण शहर आहे.(Pune news) नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या आराखड्यात म्हटलं आहे की, हा प्रकल्प पूर नियंत्रित करण्यासाठी आहे, पण प्रत्यक्षात त्यांच्या अहवालाप्रमाणेच पूरपातळ्या किमान पाच फुटांनी वाढणार आहेत. नदीकाठ सुधार प्रकल्पांतर्गत करदात्यांचे 5000 कोटी रुपये खर्चून पुण्यातील नद्यांचे मोठ्या प्रमाणावर काँक्रिटच्या भिंती उभारून नदीचं पात्र अरुंद करण्यात येणार आहे ज्याने पुराचा धोका वाढेल.

तीन बंधाऱ्यांच्या सहाय्याने प्रवाह अडवून तळी तयार करून बोटिंग करण्याची योजना आहे. सध्याच्या घडीला नदीतील सांडपाणी बघता पुणे महानगरपालिकेची हि विलक्षण कल्पना भीषण आहे. पुण्याची पावसाळ्यातली सद्‌यस्थिती बघता कॉक्रिटीकरण आपल्या हिताचे आहे असे नक्कीच म्हणता येणार नाही.(Pune news) नुकतंच जिथे वनाज मेट्रोचे स्टेशन झाले आहे, तिथे रस्त्यावर गुडघाभर पूर आला होता. अशा परिस्थितीमध्ये पाणी वाहायची जी हक्काची जागा आहे तिथे काक्रेटीकरण किती उचित आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

म्हणूनच पुण्यातले जागरूक नागरिक हे या प्रकल्पाला विरोध करत आहेत. पुण्यातील नद्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी पुण्याचे नागरिक 27 फेब्रुवारी 2022 पासून साखळी उपोषण करत आहेत.(Pune news) या साखळी उपोषणास
आज 200 दिवस पूर्ण होत आहेत. चौदा वर्षापासून 80 वर्षे वय असलेले अनेक पुणेकर, तसेच स्वयंसेवी संस्था
या साखळी उपोषणात सहभागी आहेत.

हे उपोषण कशासाठी ?

प्राध्यापक जी. डी. आगरवाल अथवा स्वामी ज्ञान स्वरूप सानंद यांनी 11 ऑक्टोबर रोजी 111 दिवसांनंतर निर्मळ आणि अविरल गंगा नदी साठी आपल्या प्राणांची आहति दिली. त्यांच्या या त्यागापुढे आम्ही नतमस्तक आहोत. पुण्याच्या नद्यांसाठी पुणेकर हा लढा गेले 200 दिवस सातत्याने देत आहोत, आणि यापुढेही तो नद्यांना न्याय मिळेपर्यंत चालूच राहील. फक्त नद्यांनाच नाही तर उपनद्या आणि ओढे सुद्धा शुदध, निर्मळ आणि अविरल होत नाहीत तोपर्यंत हे साखळी उपोषण चालू ठेवण्याचा आमचा निश्चय आहे, या साठी आम्ही पुणेकरांना अवाहन करतो कि आमच्या सोबत सहभागी व्हा.

नदीप्रेमींच्या मागण्या

1.नद्यांमधील सर्व अतिक्रमणे काढली गेलरी पाहिजेत.
2. सर्व नद्या निर्मळ झाल्या पाहिजेत.
3. नद्यांचा काटछेद कुठेही कमी होता कामा नये.
4. नद्यांचे पुनरुज्जीवन कॉँक्रेटने न करता फक्त पर्यावरणपूरक मार्गानेच पूर्ण झाले पाहिजे.

या नद्यांमुळे आपण पाणी पितो आणि म्हणूनच यांना सशक्त करण्याची आणि वाहतं ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे आणि याचं पाहिलं पाऊल नदीकाठ सुधार प्रकल्प थांबवणे आहे.(Pune news) या साखळी उपोषणात सामील व्हा. आपलं मत नोंदवा. नदी काठ सुशोभीकरण नको, पर्यावरणपूरक नदी पुनरुज्जीवन हवं आहे, असे पुणे रिव्हर रिव्हायवलच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.