Pune News : अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी ‘मॅकेनिकल माऊंटेड जाॅ क्रशर मशिन’ खरेदी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाला आता अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी ‘मॅकेनिकल माऊंटेड जाॅ क्रशर मशिन’ खरेदी करण्यात आली आहे. यामुळे पाच ते सहा मजल्याच्या इमारतीवर कारवाई करणे आता शक्य हाेणार आहे.

सदर मशिन 5 वर्षांकरिता ऑपरेशन व मेंटेनन्ससह खरेदी करण्यात आली आहे. मशीनचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, उप आयुक्त माधव जगताप, महेश डोईफोडे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याकरिता पुणे महानगरपालिकेमार्फत वारंवार कारवाई करण्यात येत असतात. अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेकारिता मशिनरी भाडेतत्वावर घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. सदर खर्चामध्ये बचत करणेच्या दृष्टीकोनातून महापालिकेचे स्वत:च्या मालकीचे मॅकेनिकल माउंटेड जॉ क्रशर मशीन खरेदी करण्यात आले.

या मशीनद्वारे 5 ते 6 मजल्यापर्यंतच्या इमारतींवर कारवाई करता येणे शक्य होणार आहे. महानगरपालिका हद्दीमध्ये आपत्ती निर्माण झाल्यास या प्रकारचे मशीन पुणे शहरात उपलब्ध नसल्याने मुंबई, ठाणे ई. शहरातून मागवावे लागत असल्याने त्यामध्ये किमान 2 – 3  दिवसांचा विलंब होतो. आपत्ती व्यवस्थापन करतेवेळी सदर मशीन अभावी झालेल्या नैसर्गिक, प्राण व वित्त हानी या सर्व बाबी टाळता येणेसाठी सदरचे मशीन अत्यंत उपयोगी असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.