Raj Thackeray Pune Sabha : राज ठाकरे यांची पुण्यात वादळी सभा; ठाकरेंचा नेमका कोणावर निशाणा?

एमपीसी न्यूज – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्याच्या (Raj Thackeray Pune Sabha) सभेवरून होणाऱ्या उलट – सुलट चर्चांना अखेर विराम मिळाला. मनसैनिकांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांनी आज (दि.22) पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी वादळी सभा घेत विरोधकांवर चांगलेच धारेवर धरले. अयोध्येचा दौरा, हिंदुत्व, राणा दाम्पत्य, हनुमान चाळीसा, महाराष्ट्रातील राजकारण असे एक ना अनेक वेगवेगळ्या विषयांवर करारा जबाब नोंदवत ठाकरे यांनी आज हल्लाबोल केला.

सभेत ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भाषणात वेगवेगळ्या मुद्यांवरून चालणाऱ्या राजकारणावर आक्षेप घेत मुख्यतः शरद पवार, एमआयएम आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.

खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर हल्लाबोल 

भाषणावेळी (Raj Thackeray Pune Sabha) राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचे सांगितले. पूर्वनियोजित असणाऱ्या अयोध्येच्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शवला होता. यावर बोलताना मनसे अध्यक्ष ठाकरे म्हणाले की, मी माफी मागावी, अशी मागणी केली. यांना आता 12 – 14 वर्षांनंतर जाग आली. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत. विषय माफी मागण्याचा आहे, तर मग गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाच्या नेत्यांनं यूपी, बिहारच्या लोकांना हाकलून दिलं. ती लोकं मुंबईत आले, इथं ‘आओ जाओ घर तुम्हारा’! तिथं गुजरातमध्ये कोण माफी मागणार, असे राज ठाकरे म्हणाले. हे राजकारण समजून घेणं गरजेचं आहे. ज्यांना आपलं हिंदुत्व झोंबलं, लाऊडस्पिकर झोंबले, ते टीका करत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

दौऱ्याच्या निमित्तानं सापळा???

अयोध्या दौऱ्यावर बोलताना ठाकरे पुढे म्हणाले, अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला. दौरा तूर्तास रद्द झाल्यानं अनेकांना वाईट वाटलं. बाबरीच्या वेळी अनेक कारसेवकांना मारण्यात आलं. त्यांची प्रेतं फेकली गेली. मला त्यांचंही दर्शन घ्यायचं होतं. मी हट्टानं जायचं ठरवलं असतं तरी हजारो माझे सैनिक अयोध्येला आले असते. तिथं जर काही झालं असतं तर आपली पोरं अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. हकनाक तुमच्यामागे ससेमिरा लागला असता. मी आपली पोरं अशी हकनाक घालवणार नाही.

सभेत उपस्थित अंध विद्यार्थ्यांना राज ठाकरे यांनी दिली मंचावर जागा 

राणा दाम्पत्यांवर निशाणा 

हनुमान चाळीसाचा मुद्द जेव्हा भाषणात (Raj Thackeray Pune Sabha) आला तेव्हा राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्याचा आवर्जून उल्लेख केला. ठाकरे म्हणाले, राणा दाम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला जाणार होते. मातोश्री काय मशीद आहे काय? मोठा गोंधळ, आरोप प्रत्यारोप झाले. एवढा गोंधळ होऊन संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लडाखमध्ये एकत्र जेवताना दिसले. हे सगळे ढोंगी आहेत असे म्हणत नेमकं काय चाललंय याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.

Pune News : जात, धर्माबाबत चुकीची वक्तव्य करु नयेत – शरद पवार

शरद पवार यांना मिश्किल टोला

दरवेळी भाषणात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उल्लेख वेगवेगळ्या कारणांसाठी होत असला तरी यावेळी सुद्धा राज ठाकरे यांनी पवार यांना चांगलाच टोला लगावला आहे. ते म्हणाले, आपल्या सभेला हॉल परवडत नाहीत, एसपी कॉलेजला विचारलं होतं, पण त्यांनी सभेसाठी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही, असं ते म्हणाले. पावसात भिजून भाषण करावं म्हटलं पण निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषणं करा? असा मिश्किल टोला राज ठाकरे यांनी यावेळी लगावला.

औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावर प्रत्युत्तर – 

एमआयएमचे नेते ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याने महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरातून त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्या भाषणात हा मुद्दा उपस्थित करत विरोध दर्शवला. राज ठाकरे म्हणाले, मला वाटलं औरंगजेबाच्या कबरीवर एमआयएमचा माणूस गेल्यावर महाराष्ट्र खवळेल; पण महाराष्ट्र थंडच. ज्याचा कोथळा शिवछत्रपती बाहेर काढतात. त्याची एवढीशी कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बघून या. त्याचा विस्तार आज 15 ते 20 हजार फुटात झालाय. अफजलखानाची मशीद तिथे उभी राहिली आहे. त्यासाठी फंडिंग येतंय. हे फंडिंग देणाऱ्या अवलादी कोण आहेत? कारण आम्ही शांत बसलो आहोत. आम्हाला कसलंही देणं-घेणं नाहीये. आम्ही लोण्याचे थंड गोळे आहोत.

समान नागरी कायद्याला समर्थन – 

पुढे ठाकरे म्हणाले, मागच्या सभेत (Raj Thackeray Pune Sabha) मी म्हणालो होतो की पंतप्रधानांना विनंती आहे की, लवकरात लवकर समान नागरी कायदा आणावा. देशाच्या लोकसंख्या नियंत्रणासाठी अजून एक कायदा आणावा आणि तिसरी विनंती म्हणजे औरंगाबादचं लवकरात लवकर संभाजी नगर हे नाव बदलून टाका. यांचं राजकारण एकदा मोडीतच काढा. यांच्या राजकारणासाठी हिंदु-मुसलमान मतांच्या ध्रुवीकरणासाठी एमआयएमला मोठं केलं. एमआयएम सतत हिंदुंविरोधात बोलत राहिली पाहिजे. ज्यातून यांची रोजीरोटी चालेल. यांच्या लक्षात आलं नाही की, आपण एक राक्षस वाढवतोय. म्हणता म्हणता यांच्या राजकारणात एमआयएमचा खासदार झाला. निजामाच्या औलादी महाराष्ट्रात वळवळायला लागल्या. यांना भुसभुशीत जमीन यांनीच करून दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणघणाती प्रहार – 

भाषणाच्या वेळी एकेकावर टीकास्त्र डागत असताना ठाकरे यांनी अखेर हिंदुत्वाचा मुद्दा छेडत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर सुद्धा सडकून टीका केली. ते म्हणाले, काय पोरकटपणा चालू आहे मला कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व. वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीज से सफेद कैसे? प्रश्न रिझल्ट्सचा आहे. जे आम्ही देतो. तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय? यांचं राजकारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला गृहीत धरून हे चालणार. काल शिवसेनेतलं कुणी बोललं की महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता हे बोलणार. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात.

यावेळची राज ठाकरे यांची पुण्यातील सभा पुन्हा वादळी ठरली, या सभेला राज्यभरातून हजारो मनसैनिकांनी उपस्थित दर्शवली. येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण आणखी कसे आणि कोण कोण ढवळणार याकडे सर्वांचे लक्ष मात्र आवर्जून यानिमित्ताने लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.