Chikhali News : गृहनिर्माण सोसायटी धारकांच्या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज –  पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ आणि अपार्टमेंट महासंघ संस्था मर्यादित या गृहनिर्माण क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेचे शाखा कार्यालय  चिखली येथील कोलोसस ग्रीन सिटी फेज -1 सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ( जाधववाडी, चिखली ) येथे आयोजित करण्यात आलेल्या सोसायटी धारकांच्या समस्या निवारण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ मर्यादित यांचे  गृहनिर्माण क्षेत्रातील  चिखली शाखेचे उदघाटन करण्यात आले. जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, पुणे शहर विभाग 6 च्या शहर उपनिबंधक  शीतल पाटील, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष  सुहास पटवर्धन, तसेच संचालक सुभाष कर्णिक , ॲड कणाद लहाने,ॲड प्रकाश तोंडारे,  चारुहास कुलकर्णी,  चिखली शाखाध्यक्ष  आशिष सातकर आदी  उपस्थित होते.

जिल्हा निबंधक  नारायण अघाव  म्हणाले की, ”बिल्डरने गृहनिर्माण केल्यानंतर सदनिकाधारकांचे जेवढे  अधिकार आहेत. तेवढेच काही कर्तव्य देखील आहेत. परंतु, हेच बऱ्याच जणांना माहिती नाही. सदनिका मालकी मिळते. पण, सोसायटीमधील सर्वांनी एकत्रित येवून जास्तीत-जास्त सोसायटी नोंदणी करून तसेच कन्व्हेयन्स डीड करून घ्यावे. जेणेकरून मूळ मालकाच्या नावे असलेली सोसायटीची जागा सोसायटीच्या नावे हस्तांतरित होईल. यासाठी बिल्डरकडे पाठपुरावा केला पाहिजे”.

पुणे शहर उपनिबंधक 6 च्या  शीतल पाटील म्हणाल्या की, ”जास्तीत-जास्त सोसायट्या कशा नोंदणीकृत होतील. यासाठी शासनाने मोहिम हाती घेतली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील सोसायटीधारकांनी हस्तांतरणासाठी / थकबाकी वसुली / पुनर्वसन / सोसायटी नोंदणी इत्यादी कामासाठी दापोडीत असलेल्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन केले.

सुहास पटवर्धन  म्हणाले की, ”पिंपरी-चिंचवड परिसरातील सोसायटीधारकांच्या तक्रारीसाठी कोलासस ग्रीन सिटी फेज -1  सोसायटीमध्ये सुरू केलेल्या महासंघाचे कार्यालय पहिल्या व तिसऱ्या  गुरुवारी सायंकाळी 7 ते 9 मध्ये सहकार दरबार साठी खुले राहील. यावेळी सोसायटीमधील नागरीकांनी तज्ञांसमोर तक्रारी निवारण करण्यासाठी प्रयत्न करावेत .

पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ मर्यादित ही संस्था ही गृहनिर्माण क्षेत्रातील निःपक्ष वाटचाल करणारी संस्था आहे. उपविधीमध्ये नोंद आहे की सर्व सोसायटीने पुढे जाऊन मार्गदर्शन  मिळवण्यासाठी गृहनिर्माण महासंघ संस्थेचे सभासद घेणे अनिवार्य आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  चारुहास कुलकर्णी यांनी केले. तर, आशिष सातकर यांनी आभार मानले. समिती सदस्य  किसन बावकर, ॲड. सचिन मोरे, राहूल गायकवाड, सचिन जरे, विजय महाजन, प्रमोद झाटे, सीए अक्षय बाहेती, नितीन अकोटकर, दिनेश काकुळते, गणेश भुजबळ, संभाजी बालघरे, ॲड. नितीन कांबळे, लक्ष्मण इंदोरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.