Pimpri News : हिवताप, डेंग्यूला आळा घालण्यासाठी खबरदारी घ्या, पालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्यासारखे साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी नागरिकांनी वेळीच खबरदारी घ्यावी. डासांच्या उत्पत्तीस आळा बसण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात,  असे आवाहन पिंपरी-चिंचवड पालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या कोरोना प्रादुर्भाव  आहे. विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्यासारखे डासांमुळे उद्भवणारे साथीचे आजार पसरण्याची शक्यता असते. हिवताप हा आजार ‘एनॉफिलस’ आणि डेंग्यू, चिकनगुणिया हे आजार पसरविण्यास ‘एडिस इजिप्टाय’ हे डास कारणीभूत असतात.

हिवताप, डेंग्यू किंवा चिकनगुनिया झालेल्या व्यक्तीला डास चावला तर, रोग्याच्या रक्तातील हिवताप, डेंग्यू आणि चिकनगुणियाचे विषाणू त्या रुग्णांच्या शरीरात शिरतात. असा विषाणूजन्य डास निरोगी माणसाला चावल्यास त्याला संबंधित रोग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या रोगांचा प्रसार थांबविण्यासाठी ‘एनॉफिलस’ आणि ‘एडिस’ डासांच्या उत्पत्तीवर आळा घालावा लागणार आहे.

घरात साठलेल्या स्वच्छ पाण्यावर मादी अंडी घालते. याचाच अर्थ डासांच्या उत्पत्तीसाठी साठलेल्या पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे घरात आणि घराजवळच्या परिसरात पाणी साठणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी.

घरात पाण्याची साठवण केली जाणारी भांडी आणि घराभोवतीच्या परिसरात साचलेले सांडपाणी अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती होते. त्यासाठी परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील फ्लॉवर प्लॉट, कुलर, मनीप्लँट, शोभेची छोटी कारंजे, फ्रीजचा खालचा ट्रे अशा ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांना अंडी घालण्यास जागा मिळते.

ही बाब लक्षात घेऊन घरातील पाणी साठविण्याची भांडी रिकामी करून कोरडी करून घेतल्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरावे. घरावर असलेली पाण्याची टाकी किंवा तळघरातील टाकीत साठलेले पाणी अशा ठिकाणी डासांनी अंडीच घालू नयेत, यासाठी या टाक्या पूर्णपणे झाकण टाकून बंद ठेवाव्यात.

घरातील फ्लॉवर प्लॉट, कुलर, मनीप्लँट, शोभेची छोटी कारंजे, फ्रीजचा खालचा ट्रे दर आठवड्यास रिकामे करून साफ करावेत. घराच्या मागील अंगणात किंवा गच्चीवरील भंगार मालाची विल्हेवाट लावावी. घराभोवतीची पाण्याची डबकी बुजवावीत किंवा वाहती करावी, असे आवाहनही डॉ.साळवे यांनी केले आहे.

ही घ्या काळजी!
# घरातील पाणी साठविण्याची भांडी पाणी वापरुन रिकामी आणि कोरडी करावी.
# त्यानंतर त्यामध्ये पुन्हा पाणी भरावे.
#घरातील पाण्याचा टाक्या पूर्णपणे झाकण लावून बंद ठेवाव्यात.
# घरातील फ्लॉवर पॉट, कुलर आणि फ्रिज खालील ‘ट्रे’मधील पाणी दर आठवड्यास रिकामे करावे.
# घराभोवतीची पाण्याची डबकी बुजवावी किंवा साठलेले पाणी वाहते करावे.
#घराच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावावी
#सर्वांनी मच्छरदाणीच्या वापर करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.