Sangvi News : परदेशी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – परदेशी महिलांना फ्लॅटमध्ये ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी (दि. 7) दुपारी लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव येथे केली.

निलेश नरेश गोस्वामी (वय 22, रा. नेहरुनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश हा लक्ष्मीनगर पिंपळे गुरव येथे सृष्टी चौक ते राम कृष्ण मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या शिवमल्हार नावाच्या बिल्डींगमध्ये किशोर कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. त्याने त्या फ्लॅटमध्ये चार परदेशी महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी ठेवले. त्या महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला.

मिळालेल्या रकमेतून आरोपीने स्वतःची उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करत आरोपी निलेश याला अटक केली. त्याच्याकडून 8 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय दंड विधान कलम 370 (3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.