Pune News : ‘गे’ व्यक्तीसोबत लग्न लावून दिले, महिलेच्या तक्रारीनंतर पती, सासरा आणि दिराविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : ‘गे’ तरुणासोबत लग्न लावून देत फसवणूक केल्याच्या कारणावरून आणि सासऱ्याने विनयभंग केल्यामूळे  32 वर्षीय महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार या महिलेचा पती, सासरा आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मे 2016 ते जुलै 2021 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादीचा पती ‘गे’ असल्याची माहिती न देता त्याच्यासोबत लग्न लावून देत फिर्यादीची फसवणूक करण्यात आली. तसेच तिचा वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ देखील करण्यात आला.

तर 60 वर्षीय सासऱ्याने वाईट उद्देशाने फिर्यादीचा हात पकडून विनयभंग केला. तसेच फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन याबाबत कोणालाही सांगू नये म्हणून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अलंकार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.