Sangvi News : खोदलेला ‘तो’ खड्डा प्रशासनाने तात्काळ झाकला

एमपीसी न्यूज – नवी सांगवी येथे देखील ड्रेनेजचे काम सुरु आहे. तीन महिन्यांपासून खोदून ठेवलेला खड्डा अद्याप झाकलेला नसल्याने तिथे गंभीर अपघाताची दाट शक्यता असल्याचे वृत्त ‘एमपीसी न्यूज’ने दिले होते. वृत्त प्रकाशित होताच काही तासातच प्रशासनाने तो खड्डा झाकून घेतला.

नवी सांगवी येथे एसबीआय बॅंकेजवळ कॉर्नरवर महापालिकेच्या माध्यमातून ड्रेनेजचे काम केले जात आहे. ज्या ठेकेदाराने हे काम घेतले आहे, त्याने ड्रेनेजसाठी खड्डा तीन महिन्यांपूर्वी खोदला. मात्र तो अद्याप झाकला नव्हता. त्याच्या बाजूला बॅरीगेट लावून फूटपाथ अडवून ठेवला होता. फूटपाथवर खड्डा असल्याने पादचारी नागरिक थेट रस्त्यावर येऊन चालतात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता होती.

जवळच विठ्ठल मंदिर आहे. या मंदिरात अनेक वृद्ध नागरिक, महिला आणि भाविक येत असतात. याच चौकात काही दुकाने असल्याने तिथेही नागरिकांचा राबता असतो. नागरिकांना खड्ड्याजवळून जावे लागते. त्यामुळे गर्दी आणि वाहतुकीची देखील समस्या निर्माण झाली होती. वृद्ध नागरिकांचा तोल जाऊन त्यात पडण्याचा धोका देखील होता. त्यामुळे ड्रेनेजसाठी खोदलेला खड्डा झाकण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

21 डिसेंबर रोजी एक जेष्ठ नागरिक सकाळी या मार्गावरून जात होते. ते ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ आले. त्यांचा तिथे तोल गेला आणि ते खड्ड्यात पडले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना डोक्यात आणि ओठावर एकूण आठ टाके पडले. त्या रात्री ते झोपी गेले आणि झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचे सांगितले. याबाबत एमपीसी न्यूजने वृत्त दिले होते. वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाने खड्डा झाकण्याचे काम हाती घेतले.

त्यांच्या नातेवाईकाने ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले, हा खड्डा अनेक दिवसांपासून खोदून ठेवला होता. अनेक नागरिकांचा अपघात होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली होती. एमपीसी न्यूजने वृत्त दिल्याने वृत्ताची दखल घेऊन खड्डा झाकण्यात आला आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.