Pimpri News : रेमडेसिवीर, प्लाझ्मा मिळविण्यासाठी नागरिकांची धावपळ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसगणिक वाढत आहे. एप्रिलच्या सुरुवातीपासून गंभीर रुग्णांची संख्या वाढली आहे. परिणामी, शहरात रेमडेसिवीर इंजेक्शन आणि  प्लाझ्मा मिळणे कठीण झाले आहे. यामुळे  रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे.  मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने काही ठिकाणी जास्त दराने रेमडेसिवीरची विक्री केली जात आहे.

रूग्णालयाबाहेर ऍ़डमिट असलेल्या रूग्णांना रेमडेसिवीर अधिक किंमतीने विकत असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका आयुक्त यांनी तीन दिवसांपूर्वी शहरातील तीन रूग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

इंजेक्शन मिळविण्यासाठी मेडिकल दुकानांच्या बाहेर नागरिकांच्या रांगा  लागत असल्याचे चित्र आहे. इंजेक्शन खरेदी करण्यासाठी डॉक्टरची चिठ्ठी, रुग्णांच्या आधार कार्डची झेरॉक्स, जो व्यक्ती इंजेक्शन घेण्यासाठी आला आहे. त्याच्या आधार कार्डची झेरॉक्स द्यावी लागते. परंतु, सद्यस्थितीत शहरातील झेरॉक्सची दुकाने बंद आहेत. त्यामुळे झेरॉक्स काढण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे.

तसेच सध्या पीएमपी बस बंद आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही. त्यांना वाहतूक करण्यास त्रास होत आहे. ज्या रुग्णालयात रुग्ण दाखल आहे. तेथील मेडिकलमध्ये आवश्यक औषधे मिळतात असा सर्वांचाच समज असतो. त्यामुळे डॉक्टरांनी रेमडेसिवीर आणण्यास सांगितल्यावर रुग्णांचे नातेवाईक रुग्णालया जवळच्या मेडिकलमध्ये जातात. तिथे गेल्यावर त्यांना कळते की रेमडेसिवीर तुटवडा आहे. त्यामुळे मिळणार नाही किंवा मिळण्यास वेळ लागेल. यामुळे मग रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते.

दरम्यान, रुग्णालयांनीच रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ कमी होईल, अशी आशा आहे.

मागील काही दिवसांपासून प्लाझ्माची मागणी वाढली आहे. साठा कमी असल्याने प्लाझ्मा मिळणे कठीण झाले आहे. तुटवडा असल्याने दाता घेवून या आणि प्लाझ्मा घेवून जा असे रक्तपेढ्या सांगत आहे. प्लाझ्मा मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.