Pimpri News : बेडची कमतरता नाही, दहा दिवसात आणखी 400 बेड उपलब्ध करणार – आयुक्त पाटील

पुढचा पंधरवाडा महत्वाचा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली. तरी, बेडची कमतरता नाही. भविष्यातील रुग्णवाढ लक्षात घेता बेडची उपलब्धता वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. पुढील दहा दिवसात ऑक्सीजनयुक्त 350 आणि व्हेंटिलेटरचे 52 असे 402 बेड उपलब्ध केले जाणार असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. तसेच जम्बो कोविड केअर सेंटरमध्येही 400 बेडची उपलब्धता असून पुढचा पंधरवडा महत्वाचा आहे. शहराचा मृत्यूदर 0.5 टक्के असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरात सध्या 17 हजार कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यातील तीन हजार रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. बाकीचे रुग्ण होम आयसोलेट आहेत. रुग्णवाढत असले तरी बेडची कमतरता नाही. जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये 400 बेड उपलब्ध आहेत. आयसीयूमध्ये 19, ऑक्सीजनमध्ये 100 पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. व्हेंटिलेटरचेही बेड उपलब्ध आहेत. गंभीर रुग्णांना  व्हेंटिलेटरच्या बेडची आवश्यकता असते.

वायसीएम रुग्णायातील रुबी हेल्थ केअर सेंटरमध्ये व्हेंटिलेटरचे 27 बेड आहेत. रुबी हेल्थ केअर अधिग्रहित केले जाणार आहे. त्याचा शेवटच्या टप्प्यात वापर केला जाणार आहे. नवीन भोसरी, जिजामाता, थेरगाव आणि आकुर्डी या चार रुग्णालयात बेड तयार करत आहोत. थेरगावातील रुग्णालयात मेडिकल गॅस पाइपलाइन बसविण्याचे काम सुरु आहे. या रुग्णालयांमध्ये पुढील दहा दिवसात 350 ऑक्सीजनयुक्त, व्हेंटिलेटरचे 52 असे 402 बेड उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.

औषधे उपलब्ध आहेत. त्याचा तुटवडा नाही. हाहाकार माजला अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. औषधे वेळोवेळी खरेदी करतो. त्याचा साठा करुन ठेवत नाहीत. औषधांवर आमची नजर आहे, असेही आयुक्त म्हणाले.

पुढील पंधरवाडा म्हत्वाचा!
शहरातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. पुढील पंधरा दिवस खूप महत्वाचे आहेत. पंधरा दिवसानंतर रुग्णवाढ कमी होण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी नियम पाळले तर लॉकडाऊनची आवश्यकता भासणार नाही. लॉकडाउनमुळे 50 टक्के फायदा होणार असेल तर नागरिकांनी नियमांचे स्वत:हून काटेकोरपणे पालन केल्यास 30 ते 35 टक्के फायदा होईल. नागरिक जोपर्यंत नियम पाळत नाहीत. तोपर्यंत निर्बंध दिखाऊ राहतात. शहराची लोकसंख्या 27 लाख आहे. पोलीस यंत्रणा कोणा-कोणापर्यंत जाणार असेही आयुक्त पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.