Pune News : पुण्यात रात्रीतून दोन खून; दत्तवाडीत भर रस्त्यात तर हडपसरला रिक्षाचालकाचा खून

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील हडपसर आणि दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी रात्री दोन खून झाल्याचे उघडकीस आले आहे. मंदार जोगदंड (वय 23, रा. दत्तवाडी) याचा दत्तवाडीत तर प्रदीप शिवाजी गवळी (वय 26) याचा हडपसर परिसरात खून झाला. या खुनप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिंहगड रस्त्यावरील नवश्या मारुतीजवळ मध्यरात्री मंदार जोगदंड याचा खून झाला. त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. दारू पिताना वाद झाल्यानंतर चार जणांनी भर रस्त्यात त्याचा खून केला. दत्तवाडी पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना ताब्यात घेतले. यातील दोघे अल्पवयीन आहेत. तर आणखी एक आरोपी फरार आहे.

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुन झालेला प्रदीप शिवाजी गवळी (वय 26) हा रिक्षाचालक आहे. आज सकाळी 15 नंबरजवळील एका स्वीटमार्टसमोर त्याचा मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याातील आरोपी अज्ञात आहेत. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.