Wakad : एकाच दिवशी वाकड परिसरात कारच्या काचा फोडून कारटेप पळवण्याच्या घडल्या पाच घटना

एमपीसी न्यूज – कारच्या काचा फोडून कारमधून कारटेप व साउंड सिस्टीम चोरून नेण्याच्या पाच घटना वाकड परिसरात एकाच दिवशी उघडकीस आल्या आहेत. अज्ञात चोरट्यांनी एकूण 84 हजार रुपयांचा ऐवज पळवला आहे. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकरणात श्यामप्रकाश जी (वय 40, रा. दक्षिण बेंगलोर, कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्रवारी (दि. 27) पुण्यात आले होते. ते रात्री भूमकर चौकातील ओयो सागर रूम्स या हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबले. रात्री अकराच्या सुमारास त्यांनी त्यांची केए 51 / एमएन 1398 कार हॉटेलच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्याने कारचा डाव्या बाजूचा काच फोडून 35 हजार रुपयांचा कारटेप चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

दुसऱ्या प्रकरणात जयप्रकाश रामशिरोमन यादव (वय 37, रा. कस्पटे वस्ती, वाकड. मूळ रा. कुसवा, असवा, जि. जौनपूर, उत्तरप्रदेश) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यादव कस्पटे वस्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवांगण सोसायटीमध्ये राहतात. अज्ञात चोरट्याने सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या यादव यांच्या कारमधून (एम एच 14 / एफ एक्स 0861) चोरट्याने 20 हजारांचा कारटेप चोरून नेला.

निर्मल धनश्याम वर्मा (रा. आयुष सेंटर, थेरगाव) यांच्या कारमधून (एमएच 14 / ईएच 6339) 12 हजारांचा कारटेप चोरून नेला आहे. विक्रम माणिकराव पातेकर (रा. मनोहर पार्क, वेणूनगर, थेरगाव) यांच्या कारमधून (एम एच 14 / एच के 1357) नऊ हजार रुपयांची साउंड सिस्टीम चोरट्यांनी चोरून नेली आहे.

तसेच मनोहर पार्क सोसायटीमध्ये राहणा-या सचिन उत्तमराव धुमाळ यांच्या कारमधून (एम एच 14 / डी एच 2030) आठ हजार रुपयांची साउंड सिस्टीम चोरून नेली आहे. वाकड मधील सर्व प्रकार शुक्रवारी (दि. 27) रात्री दहा ते शनिवारी (दि. 28) सकाळी साडेआठच्या सुमारास घडले आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.