Maval News : …आणि लोकांना वाटलं, एटीएमवर पडला दरोडा!

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील इंदोरी बायपास येथे असलेल्या एका एटीएमचा डिस्प्ले आत गेला. त्यामुळे एटीएममध्ये जाणा-या लोकांना एटीएम सेंटरमध्ये दरोडा पडल्याचा भास झाला. पोलिसांनी आणि बँक अधिका-यांनी पाहणी केली असता दरोडा पडला नसून वेगळेच सत्य बाहेर आले. हा प्रकार सोमवारी (दि. 3) इंदोरी बायपास येथे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.

पोलीस उपनिरीक्षक मारुती मदेवाड यांनी याबाबत माहिती दिली. इंदोरी बायपास येथे बँक ऑफ बडोदा या बँकेचे एटीएम सेंटर आहे. सोमवारी सकाळी या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला एटीएमचा डिस्प्ले मशीनच्या आत गेल्याचे दिसले. त्यामुळे त्या व्यक्तीला वाटले की, एटीएम सेंटरमध्ये दरोडा पडला आहे. चोरट्यांनी एटीएम फोडले आहे.

याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एटीएम सेंटरमध्ये जाऊन पाहणी केली. मशीनचा डिस्प्ले आत गेला असल्याने बँकेच्या अधिका-यांना बोलावून पोलिसांनी माहिती घेतली.

काही वेळेला एटीएम मशीन व्यवस्थित चालत नसल्याने नागरिक मशीनच्या डिस्प्लेवर जोरात दाब देऊन ते हाताळतात. अशा वेळी डिस्प्ले मशीनच्या आत जाण्याची शक्यता असते. असाच प्रकार या एटीएममध्ये देखील झाला असल्याची शक्यता बँकेच्या अधिका-यांनी वर्तवली. दरम्यान बँक ऑफ बडोदाचे एटीएम फुटल्याच्या चुकीच्या माहितीने परिसरात खळबळ उडाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.