Aurangabad News : ‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा’, राज्यपाल कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य

एमपीसी न्यूज – औरंगाबाद येथे नुकतेच समर्थ साहित्य परिषद पार पडली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ‘महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना छोटं दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.’

‘या देशाची परंपरा आहे की, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं.’ असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (सोमवारी) पुण्यात निषेध आंदोलन केले जाणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सकाळी 10.30 वा हे निषेध आंदोलन केले जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.