Pimpri News: महापालिकेच्या 13 हजार जणांना कर भरण्याच्या नोटिसा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात एकूण साडेपाच लाख मालमत्ता आहेत. एक लाखापेक्षा जास्त मालमत्ताकर असलेल्यामध्ये 27 हजार 714  मोठ्या थकबाकीधारकांचा समावेश आहे. औद्योगिकसह निवासी आणि बिगरनिवासी मालमत्तांचा समावेश आहे. महापालिका करसंकलन विभागाने सुमारे 13 हजार मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या आहेत.

कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्याचा परिणाम अर्थसंकल्पावर पाहायला मिळाला आहे. तसेच याचा परिणाम विकासकामांवर होणार आहे. उत्पन्न वाढीसाठी करसंकलन विभागाला करवसुलीचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत जास्तीत जास्त कर वसुली अभिप्रेत आहे. करसंकलन विभागामार्फत थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे.

करसंकलन विभागाकडील आकडेवारीनुसार एक लाखापेक्षा अधिक मालमत्ताकर असलेल्या मालमत्ताधारकांची संख्या 27 हजार 714 इतकी आहे. त्यामध्ये एक ते पाच लाख रुपयांपर्यंत मालमत्ताकर थकबाकीदारांची संख्या 20 हजार 561 इतकी आहे. त्यामध्ये निवासी मालमत्ताधारक 10 हजार 600, औद्योगिक 6 हजार 618 आणि मिश्र 3 हजार 343 थकबाकीदारांचा समावेश आहे.

पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची संख्या 4 हजार 153 इतकी आहे. त्यामध्ये निवासी 1 हजार 279, बिगरनिवासी 1 हजार 612, मिश्र 929 आणि औद्योगिक 333 मालमत्तांचा समावेश आहे. त्यांच्याकडून थकबाकी मालमत्ताकर वसुलीचे आव्हान करसंकलन विभागापुढे आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.