Bhosari Crime News : पतीने डोक्यात सिलेंडर घातलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज – दारू प्यायला पैसे न दिल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घातला. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना गुरुवारी (दि. 31 मार्च) रोजी बालाजीनगर झोपडपट्टी भोसरी येथे घडली. गंभीर जखमी पत्नीवर सुरुवातीला खाजगी नंतर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान पत्नीचा बुधवारी (दि. 6 एप्रिल) मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

नितीन आयलाजी वकटे (वय 35, रा. बालाजीनगर झापडपट्टी, भोसरी) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. मीना नितिन वकटे (वय 35) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीना यांच्याकडे आरोपी पती नितीन याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगत मीना यांनी नितीनला तिची पर्स दाखवली. पत्नी दारूसाठी पैसे देत नसल्याने नितीन याने मीना यांच्या डोक्यात घरातील सिलेंडर मारला. यात मीना गंभीर जखमी झाल्या.

मीना यांना तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्यांना पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. एक आठवडा त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी उपचार सुरू असताना मीना यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पती नितीन याला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.