Pune Crime News : कोथरुडमध्ये हॉटेल मॅनेजर आणि 15 जणांकडून ग्राहकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – पुण्यातील कोथरूड परिसरात मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या वडिलांना आणि त्याच्या मित्रांना हॉटेल मॅनेजरसह दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या टोळक्याने संबंधित व्यक्तींना हॉटेलमधून हाकलून दिले. एका 36 वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार या प्रकरणी 13 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल स्पाइस गार्डनचे मॅनेजर विनय शेट्टी, कॅप्टन दयानंद, सचिन आणि हॉटेलमधील इतर कर्मचारी असा एकूण तेरा ते पंधरा जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किस्किंदा नगर येथील हॉटेल स्पाइस मध्ये 25 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे काही मित्रांसह मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेल स्पाइस गार्डनमध्ये गेले होते. वाढदिवस साजरा झाल्यानंतर आणि फिर्यादीचे काही मित्र गेल्यानंतर फिर्यादी हे त्या ठिकाणी जेवण करत होते. त्यावेळी हॉटेल मॅनेजर विनोद शेट्टी त्या ठिकाणी आला आणि त्याने फिर्यादी कडे बघून खूप उशीर झाला, याचे जेवण कधी होणार हा पैसे देणार की नाही असा टोमणा मारला.

दरम्यान या सर्व प्रकारानंतर फिर्यादी यांनी गुगल पे द्वारे पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. परंतु पैसे ट्रान्सफर न झाल्याने आरोपींनी फिर्यादीला फुकटे असे म्हणत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि त्यांना हॉटेलमधून बाहेर हाकलून दिले. कोथरुड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.