Chinchwad News : स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला

पाच कोटींचे नुकसान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या तब्बल 27 सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरमधील डेटा इनस्क्रिप्ट करून सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. हा प्रकार 26 फेब्रुवारी 2021 रोजी घडला असून याबाबत 9 मार्च 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेक महिंद्रा कंपनीचे प्रोग्राम मॅनेजर महेंद्र लक्ष्मीनारायण लाठी (वय 55) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीची सर्व्हर रूम निगडी प्राधिकरण येथील अस्तित्व हॉल येथे आहे. त्या सर्व्हरवर रन्समवेअरने अटॅक केल्याचे उघडकीस आले आहे. स्मार्ट सिटीचे सॉफ्टवेअर सुरु करण्यापूर्वीच हा हल्ला झाला आहे. 27 सर्व्हरमधील डेटा इनस्क्रिप्ट करण्यात आला आहे. तो डेटा पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी अज्ञातांकडून बिटकॉइनची मागणी केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

ज्या व्यक्तीने हा डेटा इनस्क्रिप्ट केला आहे, त्याच व्यक्तीला तो डेटा डिस्क्रिप्ट करता येतो. या प्रकारात सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 26 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला असून सुमारे 10 दिवसानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड सायबर विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुंगार तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.