Chakan News : वकिलांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला
साडे पाच तोळे दागिने व रोकड लंपास
एमपीसी न्यूज : घराच्या बेडरूमच्या खिडकीचे गज वाकवून वकिलाच्या घरात शिरलेल्या चोरट्यांनी घरातील रोख रकमेसह साडे पाच तोळ्यांचे दागिने असा एकूण साडे सतरा लाखांचा ऐवज रातोरात लुटून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. चाकण – शिक्रापूर रस्त्यावरील शेलपिंपळगाव ( ता. खेड ) येथे शुक्रवारी ( दि. 27 मे ) सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला.
अॅड. सोमनाथ मकरध्वज दौंडकर ( वय – 39, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड ) या वकिलांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वृत्त असे की, अॅड. सोमनाथ दौंडकर शेलपिंपळगाव येथे ते आपल्या कुटुंबीयासमवेत राहतात. गुरुवारी (दि. 26) रात्री बारा ते शुक्रवारी ( दि. 27 मे ) सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान चोरीची ही घटना घडली. दौंडकर व त्यांचे कुटुंब गुरुवारी रात्री झोपल्यानंतर अनोळखी चोरटे त्यांच्या घराजवळ आले. चोरट्यांनी यावेळी घराच्या बेडरूमच्या खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी यावेळी घरातील कपाटाचे लॉक तोडून त्यातील साहित्यांची इतरत्र फेकाफेक करत कपाटातील कर्णफुले, चैन, अंगठी, लॉकेंट असे साडे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. त्याचप्रमाणे दुकानातील रोकड असा एकूण साडे सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करित आहेत.