Chakan News : औद्योगिक भागात दहशत करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष

तक्रारी करण्याचे चाकण पोलिसांचे आवाहन

एमपीसी न्यूज : कंपन्यांमध्ये ठेकेदारी किंवा अन्य कारणांसाठी दादागिरी करणाऱ्या मंडळींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. औद्योगिक भागातील असामाजिक प्रवृत्तींची  माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहन चाकण पोलिसांनी शुक्रवारी (दि.27)  केले आहे.

चाकण पोलीस ठाण्यातील अर्जुन सभाग्रहात चाकण पोलीस ठाणे हद्दीतील कारखानदार, वाहतूकदार ,वेअर हाऊस मालक , अधिकारी यांची बैठक शुक्रवारी   घेण्यात आली. यावेळी कारखानदार , वेअर हाऊसचे मालक यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.  पोलीस खात्याच्या अखत्यारीतील समस्येचे निराकरण सुरु करण्यात आल्याचे यावेळी चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी सांगितले.

चाकण औद्योगिक भागातील  कंपनीच्या आतील बाजूस व बाहेरील बाजूस उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या बाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. बाहेरील कोणी व्यक्ती , कंत्राटदार स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंपनी मालक अथवा अधिकाऱ्यांना विनाकारण दमदाटी करीत असेल, अथवा त्रास देत असतील, तर तात्काळ चाकण पोलीस ठाणे येथे तक्रार देण्याचे आवाहन देखील चाकण पोलिसांनी केले आहे .

कंपनीद्वारे नेमलेले सिक्युरिटी कायदेशीर दर्जा संपन्न असलेले नेमावे, कंपनी स्तरावर वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्याचे आवाहन देखील करण्यात आले. यावेळी चाकण परीसारासतील 50 ते 60 कारखानदार, वाहतूकदार, व वेअर हाऊस मालक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.