Pune News : लाच प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षकाला 3 वर्षे सक्तमजुरी

एमपीसी न्यूज : फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 5 लाखांची लाच मागून त्याचा पहिला हप्ता म्हणून 50 हजारांची लाच घेणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस नाईक यांना विशेष न्यायालयाने 3 वर्षे सक्तमजुरी व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

विठ्ठल शिवाजी शिगटे (सहाय्यक पोलीस निरीक्षक) व दत्तात्रय विठोबा नाईक (पोलीस नाईक) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहे. या दोघांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल केस मिटवण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती त्यांनी 5 लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यांपैकी 50 हजार रुपये सदाशिव पेठ येथील एका उपहारगृहात 25 एप्रिल 2014 रोजी स्वीकारताना ऍन्टि करपश्‍नच्या पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली.

त्यानंतर त्यांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात विशेष सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. सरकारी पंच साक्षीदार यांची साक्ष न्यायालयाने कोणत्याही साक्षीदाराच्या कागदपत्राशिवाय ग्राह्य धरावी, असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा साळवी यांनी दिला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.