Pune News : मित्राचा मुलगा दारू पिताना दिसला, डोक्यात बिअरची बाटलीच फोडली

एमपीसी न्यूज : तू माझ्या मित्राचा मुलगा आहेस, दारू कशाला पितोस असे सांगितल्याने झालेल्या वादातून एकाने मित्राच्या डोक्यातच बीअरची बाटली फोडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ताडीवाला रस्त्यावरील नदीकिनारी 22 मे रोजी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. बंडगार्डन पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मोहन उर्फ ढंप्या हरी पांढरे (वय 38, प्रतिभा रेसिडेन्सी ससाणे नगर हडपसर) असे आरोपीचे नाव असून बंडगार्डन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तर विकी उर्फ नेप्या काशिनाथ कांबळे (वय 21, दुष्काळ झोपडपट्टी ताडीवाला रोड) याने या प्रकरणी तक्रार दिली आहे. फिर्यादी हा देखील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे मित्र दारू पीत असताना फिर्यादी हे त्यांच्यासोबत गप्पा मारत बसले होते. यावेळी आरोपी त्या ठिकाणी आला आणि फिर्यादीचा मित्र प्रतिक याला ‘तू माझ्या मित्राचा मुलगा आहेस कशाला दारू पितो’ असे बोलला. यावेळी फिर्यादीने ‘पहिले आपण दारू न पिता दुसऱ्याला सांगावे’ असे म्हणाला.

याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी ला शिवीगाळ करत ‘तू कोण मला विचारणारा, तू काय ताडीवाला रोडचा मोठा भाई आहेस काय? अशी विचारणा केली आणि आज तुला जिवंत सोडणार नाही आज तुझा कार्यक्रम करतो, असे म्हणून खाली पडलेली बिअरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारली. तसेच खाली पडलेले दगड उचलून त्याच्या पायावर मारहाण केली. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.