Padma Vibhushan Birju Maharaj : पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांच्या आयुष्याचा लेखाजोगा

एमपीसी न्यूज : (पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांचे काल मध्यरात्री निधन झाले. त्यांचे शिष्य पं नंदकिशोर कपोते यांनी पिंपरी – चिंचवड अंतरंग दिवाळी अंकासाठी लिहिलेला हा लेख एमपीसी न्यूजच्या वाचकांसाठी पुर्नप्रकाशित करण्यात येत आहे). भारतीय शास्त्रीय नृत्य शैलींचे आठ प्रकार आहेत. उत्तर प्रदेशातील कथक, तामिळनाडूचे भरतनाट्यम् , केरळचे कथाकली व मोहिनी अट्टम, मणिपुरचे मणिपुरी, ओडिसाचे ओडिसी, आंध्रप्रदेशाचे कुचिपुडी, आसामचे सत्रिय. महाराष्ट्रात यापैकी प्रचलित लोकप्रिय शैली आहेत कथक, भरतनाटयम् व ओडिसी.

उत्तर प्रदेशातील कथक नृत्यशैली ही एक नैसर्गिक अर्थात सर्वांग सुंदर नृत्त, नृत्य, नाटय यांनी परिपूर्ण अशी शैली आपले खास वेगळेपण टिकवून आहे. नृत्त, नृत्य, नाट्य, अर्थात पदन्यास (लय-ताल), तोडे-तुकडे, गतनिकास, गत भाव अभिनय अशा सर्व शृंगाराने नटलेले, बहरलेले हे कथक नृत्य आणि ज्यावेळी कथक नृत्य समोर येते त्यावेळी आठवतात लय व अभिनयाचे बादशहा पद्मविभूषण कथक सम्राट पं. बिरजू महाराज.

त्यांनी कथक विश्वात आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे. कथकचा प्रचार व प्रसार करण्यास या जेष्ठ व श्रेष्ठ कलाकाराचे मोलाचे योगदान आहे ,हे एक निर्विवाद सत्य आहे. कथक म्हणजे बिरजू महाराज व बिरजू महाराज म्हणजे कथक हे समीकरण कायमचे रूढ झाले आहे.

कथक नृत्याची चार घराणी आहेत. लखनौ घराणा, जयपुर घराणा, बनारस घराणा व रायगड घराणा. पं. बिरजू महाराज हे लखनौ घराण्याचे. आज पं. बिरजू महाराजांच्या अथक परिश्रमामुळे लखनौ घराणे उंच शिखरावर पोहोचले आहे. साऱ्या विश्वात लखनौ घराण्याचे मूळ प्रवर्तक स्व.पं. ईश्वरी प्रसाद मिश्र, या घराण्याच्या नऊ पिढ्या झाल्या आहेत. बिरजू महाराज हे सातव्या पिढीतले. बिरजू महाराजांच्या आजोबांचे नाव कालका प्रसाद महाराज तर चुलत आजोबांचे नाव बिंदादीन महाराज.

पूर्वीच्या काळी लखनौ घराण्यास  कालका-बिंदादीन घराणे म्हणूनही ओळखत असत. बिंदादीन महाराज हे कथक नृत्यात तर पारंगत होतेच, याशिवाय ते रचनाकारही होते. त्यांनी पाच हजार दादरा, ठुमरी, भजन लिहिले त्याचा फायदा आज सर्व कथक कलाकारांना होत आहे. आज सर्व कथक कलाकार पं.बिंदादीन महाराजांची ठुमरी, दादरा, भजन सादर करताना दिसतात.

पं. बिरजू महाराजांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ वसंत पंचमीच्या दिवशी लखनौ येथील डफरिन हॉस्पिटलमध्ये झाला. महाराजजींच्या  आई महादेई यांनी मला सांगितले की ज्यावेळी दवाखान्यात महाराजजींचा जन्म झाला तेव्हा महाराजजी फक्त एकटा मुलगा जन्माला आले होते बाकी तेथे सर्व मुलीच जन्माला आल्या होत्या. (जणु वृंदावनातील गोपी आणि कृष्ण). तेथे शेजारी राहणारे एक कल्लू भाई दवाखान्यात महाराजजींना बघायला आले व म्हणाले ” अरे हा तर ब्रज का मोहन आहे” आणि महाराजजींचे नाव ब्रज मोहन ठेवले गेले. दुःखहरणनाथ हे त्यांचे राशीचे नाव परंतु पुढे ते बिरजूमहाराज या नावाने सगळीकडे ओळखले जाऊ लागले.

नृत्याचे शिक्षण त्यांना आपले वडिल स्व. अच्छन महाराज जी यांच्याकडून मिळाले. केवल बिरजू महाराज साडे सात वर्षाचे असताना अच्छन महाराजजींनी बिरजू महाराजांना गंडाबंध शिष्य केले. बिरजू महाराज नऊ वर्षाचे असताना अच्छन महाराजनींचे देहावसान झाले. मात्र त्यांना पुढे आणण्यात सर्वात मोठा वाटा त्यांच्या आई अम्माजींचा. अम्माजींनी त्यांना बिंदादीन महाराजांच्या ठुमऱ्या शिकवल्या.

बिरजूमहाराजांना त्यांचे काका पं. शंभू महाराज व पं. लच्छु महाराज यांच्याकडुनही नृत्यांचे मार्गदर्शन लाभले. केवळ साडेसात-आठ वर्षांचे असताना पं.बिरजू महाराजांनी दिल्ली येथील ज्युबिली टॉकीज मध्ये नृत्याचा जाहीर कार्यक्रम करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यावेळी त्यांना फक्त ५०० रुपये मिळाले होते. लहानपणी त्यांना पतंग उडवण्याचा खूप नाद होता.

स्व. पं. अच्छन महाराजजींची शिष्या स्व.डॉ.कपिला वात्स्यायन बिराजू महाराजांना लखनौहून दिल्लीला घेऊन आली आणि केवळ १४ वर्षाचे असताना बिरजू महाराज संगीत भारती दिल्ली येथे नृत्य शिकवू लागले. साडे चार वर्ष ते तेथे होते त्यानंतर महाराजजींना भारतीय कला केन्द्र येथे आमंत्रित केले गेले व तेथे महाराजजी नृत्य शिकवू लागले.

काही काळानंतर संगीत नाटक अकादमीच्या वतीने कथक केन्द्रची स्थापना झाली व तेथे बिरजू महाराज मुख्य गुरू म्हणून नियुक्त झाले. तेथे बॅले विभागाचेही ते संचालक होते. १९९८ साली पं.बिरजू महाराज कथक केंद्रातून निवृत्त झाले. आणि त्यांनी दिल्ली येथे स्वतःची ‘कलाश्रम’ नावाची कथक नृत्य संस्था स्थापन केली व त्याद्वारे आज वयाच्या ८४ व्या वर्षी ही कथक नृत्याचे प्रसार व प्रचार करण्याचे कार्य चालू आहे.

महाराजजींना मी प्रथम भेटलो १९७४ मध्ये त्यावेळी मी पुण्याला ‘कलाछाया’ संस्थेत नृत्य शिकत होतो, तेथे पं.बिरजू महाराजजी कार्यक्रमासाठी आले होते. तेथे एका झाडाखाली कट्टयावर एक आकर्षक व्यक्तिमत्वाचे पं. बिरजू महाराज बसले होते. मी त्यांच्या जवळ गेलो, त्यांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला. त्यांनी माझे नांव विचारले ही महाराजजींशी माझी पहिली भेट. त्याच रात्री महाराजजींचा बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम होता.

कार्यक्रमाच्या आधी संस्थेच्या वतीने मी महाराजजींना रंगमंचावर नारळ, पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान केला. हे माझे फार मोठे सौभाग्य होते. त्यानंतर मी आयुष्यात प्रथमच महाराजजींचे एवढे सुंदर नृत्य  पहिले व त्याच वेळी मनाशी ठरवले की मी महाराजजींकडेच नृत्य शिकणार!

बी. कॉम चे शिक्षण पूर्ण करून, नृत्याच्या उच्च शिक्षणासाठी मी राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरला व मला मुलाखतीसाठी दिल्लीला बोलावण्यात आले. त्यावेळी मुलाखत घेण्यासाठी नामवंत कलाकार होते पं. मोहनराव कल्याणपूरकर, डॉ. कपिला वात्स्यायन, पद्मभूषण कुमुदिनी लाखिया, पद्मश्री दमयंती जोशी व स्वतः पद्मविभूषण पं. बिरजू महाराज. संपूर्ण भारतातून विद्यार्थी मुलाखतीसाठी आले होते. आणि त्यावेळी एवढ्या विद्यार्थ्यांमधून केवळ दोनच विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी निवडण्यात आले होते. त्यातील एक विद्यार्थी मी होतो याचा मला अभिमान वाटतो.

त्यावेळी ही भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवणारा मी महाराष्ट्रातील पहिला मुलगा होतो. ही शिष्यवृत्ती मिळवून मी दिल्लीला कथक केन्द्र (संगीत नाटक अकादमी चा विभाग) सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार येथे पं. बिरजू महाराजांकडे १ नोव्हेंबर १९७८ रोजी कथक नृत्याचे उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलो. महाराजजींकडे मी गुरुशिष्य परंपरेनुसार दहा वर्षे कथक नृत्याचे शिक्षण घेतले. त्या काळी गुरु शिष्याची परिक्षा घेते असत. शिष्य योग्य पात्रतेचा आहे का हे बघत असत. त्यामुळे मलाही महाराजजींनी सुरुवातीला काही दिवस शिकविले नाही.

परंतु ते माझ्याकडे बारकाईने लक्ष देत असत. मी महाराजजींची सर्व कामे करत असे. त्यांची सेवा करत असे. काही दिवसातच मी महाराजजींचा आवडता शिष्य झालो. महाराजजी मला सर्व ठिकाणी बरोबरच घेऊन जायचे. महाराजजींच्या घरीही मी रहात असे. असेच एकदा मी रात्री महाराजजींची सेवा करत होतो त्यांचे पाय दाबत होतो. त्यानंतर महाराजजी झोपले म्हणून मी झोपण्यासाठी जायला उठलो तेवढ्यात महाराजजी झोपेतून जागे झाले व मला म्हणाले “नंदू, खडे हो जाओ ” आणि त्यांनी आमद (कथक नृत्याचा एक प्रकार) शिकविला. अशा प्रकारे माझा महाराजजींकडे रात्री 1 वाजता कथक नृत्याचा श्री गणेशा झाला. त्यानंतर मात्र महाराजजींनी मला भरपूर शिकविले.

त्यावेळी महाराजजी अनेक बॅले (नृत्यनाटीका) ची निर्मिती करत होते. मला आठवते मला महाराजजींच्या सर्व बॅले मध्ये कथा रघुनाथ की, कृष्णायन, हब्बाखातून, रूपमती बाजबहादूर, होरी धुम मचोरी या मध्ये काम करण्याची संधी मिळाली. महाराजजींकडे नृत्याचे शिक्षण पूर्ण करून मला पुण्याला यायचे होते. परंतु महाराजजींना सोडून दूर जाणे ही कल्पनाच मला सहन होईना.

महाराजजींची इच्छा होती की,मी महाराष्ट्रात येऊन कथक नृत्याचा खास त्यांच्या शैलीचा प्रचार व प्रसार करावा. त्यावेळी महाराजजी म्हणाले ” नंदू तुम कहीं भी रहो, जब तक तुम्हारे पैरों में घुँघरू है, तब तक मैं तुम्हारे साथ हूँ!” हे त्यांचे शब्द आजही माझ्या कानात घुमत असतात. आज ४४ वर्ष झाले आमचे गुरु शिष्याचे नाते आजही कायम आहे.

कथक नृत्याची लयकारी व भावदर्शन ही दोन प्रमुख अंगे. या दोन्हींवरही महाराजजींचे प्रभुत्व आहे. ते कुशल नर्तक आहेत त्याचप्रमाणे ते उत्कृष्ट संगीतकार, गायक व वादकही आहेत. ते तबला ढोलकी नाल सतार, सरोद, व्हायोलिन, सारंगी ही सर्व वाद्ये चांगल्या प्रकारे वाजवतात. दिल्ली आकाशवाणीवर त्यांचे गाण्याचे कार्यक्रम नेहमी होत असतात. ते कुशल चित्रकार व अप्रतिम कवी ही आहेत. त्यांनी असंख्य कविता, ठुमरी, भजन लिहीले आहेत. त्यांनी शतरंजके खिलाडी व देवदास या चित्रपटात स्वतः गाणे ही गायले आहे.

महाराजजींनी शतरंज के खिलाड़ी, दील तो पागल है, गदर, देवदास, प्रणाली, विश्वरुपम् , डेढ़ इश्कियाँ, बाजीराव मस्तानी या प्रसिद्ध चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार (२०१६) आणि विश्वरूपम् चित्रपटासाठी उत्कृष्ट नृत्य निर्देशनासाठी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार (२०१३) मिळाला आहे. महाराजजींना त्यांच्या कथक नृत्यातील योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. संगीत नाटक अकादमी अवॉर्ड, भारत सरकारचा पद्मविभूषण पुरस्कार (१९८६) पं. भीमसेन जोशी पुरस्कार (२०१२), दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, कालिदास सम्मान ,

विमल भास्कर पुरस्कार (२०१२) असे महत्वपूर्ण ३३ पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. महाराजजींनी आतापर्यंत अनुभूती, रसगुंजन, अंगकाव्य, बृजश्याम कहे इ. पुस्तके लिहीली आहेत. मी नुकतेच ‘नृत्यसम्राट पं. बिरजू महाराज हे महाराजजींच्या संपूर्ण कार्यावर व व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारे पुस्तक प्रकाशित केले आहे. पं. बिरजू महाराज हे आंतरराष्ट्रीय कीर्तिचे महान नर्तक असुनही ते अतिशय नम्र आहेत. त्यांचे राहणीमान साधे आहे. ते शुद्ध शाकाहारी आहेत. महाराजजींचा स्वभाव असा आहे की ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपले वाटतात.

महाराजजींचे माझ्या आयुष्यात फार महत्वपूर्ण स्थान आहे. महाराजजी माझे आई-वडिल, माझे दैवत आहेत. माझ्या प्रत्येक महत्वाच्या श्रेणी महाराजजी माझ्या जवळ होते. मला आठवते मी ज्या ज्या वेळी कोणतेही नवे कार्य सुरू करण्याचे ठरवले त्याचे उद्घाटन महाराजजींच्या करकमलाद्वारे संपन्न झाले. आमची नंदकिशोर कल्चरल अकादमीची नवी इमारत तयारी झाली त्याचे उद्घाटन २००० मध्ये महाराजजींच्या हस्ते झाले.

मी महाराजजींच्या मार्गदर्शनाखाली कथक नृत्यात पीएचडी (डॉक्टरेट) मिळविली. त्याच्या पदवीदान समारंभाच्या दिवशी (१५ जानेवारी २००५) दैवयोगाने महाराजजी टिळक विद्यापीठात रंगमंचावर उपस्थित होते. आणि महाराजजींचे आशिर्वाद घेऊनच मी पीएचडी पदवी स्विकारली. मी २००६ मध्ये पं. बिरजू महाराज डान्स अॅन्ड म्युजिक रिसर्च सेंटर व पं. बिरजू महाराज ग्रंथालयाची स्थापना केली. त्याचे उद्घाटन महाराजजींच्या हस्तेच संपन्न झाले.

२००६ सालीच मी महाराजजींच्या जीवनावर आधारीत मराठी पुस्तक लिहीले “कथक सम्राट बिरजू महाराज” त्याचे प्रकाशन ही महाराजजींच्या हस्ते झाले. आणि अगदी किरकोळ गोष्ट  म्हणजे २००६ मध्ये माझी वेबसाईट तयार झाली, २०१६ मध्ये माझ्या नृत्य अकादमीच्या आवारात प्रेक्षकांना बसण्यासाठी ब्लॉक चे काम सुरू झाले त्याचा शुभारंभ ही महाराजजींच्या हस्ते झाला. त्यांचे आशिर्वाद सदैव माझ्या बरोबर आहेत हे माझे अहोभाग्य!

महाराजजी अष्टपैलू कलाकार, महान गुरु आहेत. माझे हे सौभाग्य की आजही मी महाराजजींकडे शिकत आहे. ३-४ दिवसाननंतर न चुकता महाराजजींशी व्हिडीओ कॉलवर बोलणे होत असते. परमेश्वराजवळ हीच प्रार्थना की महाराजजींना उदंड अायुष्य लाभो, महाराजजींना शत् शत् प्रणाम!

डॉ. नंदकिशोर कपोते

(महाराष्ट्र राष्ट्र अवॉर्डी,

महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र अवॉर्डी)

 मो. ९३७१०९९९११

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.