Akurdi News: आपुलकीने वागणारा, मनमिळाऊ, कंपनीच्या आवारात राहणारा उद्योगपती हरपला; राहुल बजाज यांच्या निधनाबाबत कामगार वर्गामध्ये हळहळ

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे आज (शनिवार) वयाच्या 80 व्यावर्षी निधन झाले आहे. जवळपास पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. आकुर्डीतील बजाज कंपनीच्या आवारातच ते राहणारे एकमेव उद्योजक होते. कामगारांशी आपुलकीने वागणारे राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राची मोठी हानी झाली. बजाज यांच्या निधनामुळे कामगार वर्गामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

कंपनीच्या आवारात राहणारे, कामगारांचे दु:ख जाणणारे बजाज साहेब यांच्या निधनाने मोठी हानी – पवार

विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष, बजाज कंपनीत 36 वर्षे काम करणारे दिलीप पवार म्हणाले, ”राहुल बजाज यांनी बजाज उद्योग समुह भरभराटीला नेला. हजारो लोकांना नोक-या दिल्या. लाखो लोकांचा उदरनिर्वाह होत होता. डॉलरमध्ये कंपनीचे उत्पादन, नफा वाढविला. कामगारांची प्रगती केली. भक्कम, सडेतोड, नेतृत्व, निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे होती.कामगारांची भरभराट केली. त्यांच्या निधनाने कधीही न भरुन येणारे नुकसान झाले”.

खासदार झाल्यानंतर भेटायला गेल्यावर कंपनी स्थापनेपासूनचे सांगितले होते अनुभव

”बजाज साहेब राज्यसभेचे खासदार झाल्यावर युनियम म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटायला गेलो होतो. कामगार असतानाही त्यांनी आम्हाला अर्धा तासाचा वेळ दिला. दिलखुलास गप्पा मारल्या. कंपनी स्थापनेपासूनचे सर्व अनुभव शेअर केले. 1965 पासूनचे अनुभव सांगितले. उद्योजकांमधील बजाज साहेब एकमेव कंपनीच्या आवारात राहणारे उद्योजक होते. त्यांना कामगारांच्या दुख:ची जाणीव होती. कामगारांशी ते आपुलकीने, प्रेमाने संवाद साधतात. कामराबांबत त्यांना विशेष जिव्हाळा होता” असेही पवार म्हणाले. त्यांच्या निधनाने कामगार वर्गामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत बजाज समुहाचे मोठे योगदान – बेलसरे

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले, ”राहुल बजाज यांनी जवळपास पाच दशकांपासून बजाज ऑटोची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. बजाज ऑटोला यशोशिखरावर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत बजाज समुहाचे मोठे योगदान आहे. बजाज समुहामुळे लाखो कामगारांना रोजगार मिळाला. कामगारांशी आपुलकीने वागणारे उद्योजक अशी त्यांची ओळख होती. आकुर्डीतील कंपनीच्या आवारातच बजाज साहेबांचे वास्तव्य होते. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले आहे”.

पिंपरी-चिंचवडकरांचे वर्तुळ बजाजशिवाय पूर्ण होवू शकत नाही – लांडगे

भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे म्हणाले, ”भारतातील प्रसिध्द उद्योगपती आणि बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांचे शनिवारी निधन झाले. हे वृत्त पिंपरी-चिंचवडकरांसाठी वेदनादायी आहे. भारताच्या उद्योग क्षेत्रातील राहुलजी यांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवडला ‘ऑटो हब’बनवण्यात बजाज समुहाचा मोलाचा वाटा आहे. बजाज यांच्या जाण्याने ‘उद्योगनगरी’चे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. शहराची वाटचाल आता स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू आहे. त्याच्या पायाभरणीमध्येच खऱ्या अर्थाने बजाज समुहाचा हातभार आहे. आज शहरातील हजारो कामगारांना रोजगार मिळाले आणि शहराला कामगारनगरी अशी ओळख प्राप्त झाली. त्यामुळे आम्हा पिंपरी-चिंचवडकरांचे वर्तुळ बजाजशिवाय पूर्ण होवू शकत नाही. राहुलजी बजाज यांच्या जाण्याने न भरुन येणारी हानी झाली आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.