Pune News : महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण, कार्यालयांची तोडफोड; 54 जणांना अटक 

पश्चिम महाराष्ट्रामध्ये 82 आरोपींविरुद्ध फौजदारी

एमपीसी न्यूज – थकीत वीजबिल धारकांचे वीज कनेक्शन कट करण्याचे काम सध्या राज्यात सुरू आहे. हे काम करत असताना पश्चिम महाराष्ट्रात अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, मारहाण करून कार्यालयांची तोडफोड करण्याचे 30 प्रकार घडले आहेत.

या प्रकरणी एकूण 82 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी 54 आरोपींना अटक करण्यात आली. तर न्यायालयाने जामीन नाकारल्याने काहीजण अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहे.

वीजबिल थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी येणाऱ्या अभियंता, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण करण्याचे तसेच काही ठिकाणी कार्यालयांची तोडफोड करण्याचे प्रकार घडत आहेत. याविरुद्ध महावितरणने कठोर पवित्रा घेतला असून आरोपींविरुद्ध संबंधीत पोलीस ठाण्यात तात्काळ फौजदारी तक्रारी दाखल करण्यात येत आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांची महावितरणचे संबंधीत मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांनी याआधीच भेटी घेतल्या आहेत. मारहाण किंवा तोडफोडप्रकरणी आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करण्याची लेखी विनंती केली आहे.

त्यानुसार सर्वच पोलीस ठाण्यांकडून सकारात्मक सहकार्य मिळत असून पुणे जिल्ह्यात 7 प्रकरणांत 16 आरोपींविरुद्ध तर कोल्हापूर जिल्ह्यात 6 प्रकरणांत 34, सांगली जिल्ह्यात 3 प्रकरणांत 5, सोलापूर जिल्ह्यात 7 प्रकरणांत 13 व सातारा जिल्ह्यात 7 प्रकरणांत 14 आरोपींविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांत आतापर्यंत एकूण 82 आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी 54 जणांना अटक करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.