Chikhali News : पूर्णानगर मधील भाजप राष्ट्रवादीच्या शाब्दिक चकमकी प्रकरणी दोन्ही पक्षातील 30 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पूर्णानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रविवारी (दि. 6) आंदोलन केले. त्यावेळी झालेल्या भाजप आणि राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांच्या शाब्दिक चकमकी प्रकरणी दोन्ही गटातील 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुशाग्रह अशोक कदम (रा. संभाजीनगर, चिंचवड) आणि राष्ट्रवादीचे 15 कार्यकर्ते तसेच मोतीराम रावसाहेब पवार (रा. पूर्णानगर, चिंचवड) आणि भाजपचे 15 कार्यकर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत देशमुख यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पूर्णानगर इथल्या श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी पर्यटन केंद्राचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन होते. त्या कार्यक्रमासाठी फडणवीस आले होते. दरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. त्यांनी परस्परविरोधी घोषणा दिल्या. त्यात दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची शाब्दिक चकमक झाली. दोन्ही पक्षातील लोक आक्रमक होऊन एकमेकांच्या अंगावर धावून गेले.

पिंपरी चिंचवड शहरात पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. असे असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी जमाव जमविला. दोन्ही पक्षातील 30 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.