Coronavirus Is Airborne Say Scientists: हवेतूनही कोरोना विषाणू पसरतो, शेकडो शास्त्रज्ञांचा दावा

Coronavirus Is Airborne Say Scientists: Corona virus spreads through air, hundreds of scientists claim 32 देशातील त्या 239 शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला एक खुले पत्र लिहिले आहे.

एमपीसी न्यूज- जर तुम्ही गर्दीपासून दूर मास्क न घालता फिरत असाल. इतरांच्या संपर्कापासून लांब आहात. त्यामुळे आपल्या शरीरात कोरोना विषाणूचा शिरकाव होणार नाही, असे जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा. कोरोना विषाणू एअरबॉर्न म्हणजेच हवेच्या माध्यमातूनही पसरतो, असे जगभरातील शेकडो शास्त्रज्ञांच्या संशोधनातून समोर आले आहे. 32 देशातील 239 शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात कोरोना विषाणूचे छोटे-छोटे कण हवेतही जिवंत राहतात आणि ते लोकांना बाधित करु शकतात, असे दिसून आले आहे.

हा विषाणू हवेमुळे पसरत नाही, असे यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) हा विषाणू पसरण्याच्या पद्धती स्पष्ट करताना सांगितले होते. डब्ल्यूएचओने तेव्हा स्पष्ट केले होते की, हा घातक विषाणू केवळ थुंकीच्या कणांमुळे पसरतो.

हे कण कफ, शिंक आणि बोलण्यामुळे शरीरातून बाहेर पडतात. थुंकीचे कण इतके हलके नसतात की जे हवेबरोबर उडून जातील. ते लगेच जमिनीवर पडतात.

परंतु, ‘न्यूयॉर्क टाइम्स’ मध्ये आलेल्या एका ताज्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांचा नवा दावा आता वेगळेच काही तरी सांगत आहे. शास्त्रज्ञांनी डब्ल्यूएचओला या विषाणूच्या रिकमंडेशन्समध्ये त्वरीत दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, जगभरात या विषाणूची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

32 देशातील त्या 239 शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला एक खुले पत्र लिहिले आहे. या सर्व शास्त्रज्ञांनी याचे पर्याप्त पुरावे असल्याचा दावा केला आहे. या विषाणूचे छोटे-छोटे कण हवेत तरंगत राहतात. त्यामुळे लोक बाधित होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. हे पत्र सायंटिफिक जर्नलमध्ये पुढील आठवड्यात प्रकाशित होईल.

‘रॉयटर’ या वृत्तसंस्थेने याप्रकरणी जागतिक आरोग्य संघटनेला या नव्या दाव्यावर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांना यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या या वृत्तानुसार, शिंकल्यानंतर बाहेर येणारे थुंकीचे मोठे कण असो किंवा छोटे कण, ते संपूर्ण खोलीत पसरू शकतात. जेव्हा दुसरे लोक श्वास घेतात. त्यावेळी हवेत उपस्थित असलेले विषाणूचे हे कण शरीरात प्रवेश करुन आपल्याला बाधित करु शकतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.